

बंगळूर : शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना शालेय शिक्षण विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातील शासकीय शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी विभागाने अदालत पद्धतीची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे पुढील १०० दिवसांत १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असून, अधिकृत अधिसूचना पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे.
शासकीय शाळांमध्ये संगणक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या संगणक विषयांना मोठी मागणी असल्याने प्राथमिक स्तरावर यासंदर्भात प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्रपणे २,५०० संगणक शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पुढील आठवड्यात अधिसूचना जारी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी संगणक शिक्षकांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार असून, कर्नाटक परीक्षा प्राधिकरण ही परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणार आहे. पुढील दोन महिन्यांत भरतीची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेदेखील या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सध्या राज्यात शासकीय शाळांमध्ये विविध विषयांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची ८० हजारांहून अधिक पदे खाली आहेत. ही पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत.