

विजापूर : जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यात तीव्र उष्णतेचा आणखी एक बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नळतवाड होबळी परिसरातील इंगळगी-टक्कळकी गावातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. श्रीशैल बसवंतप्प बिरादार असे त्याचे नाव असून उपचारावेळी बुधवारी मृत्यू झाला.
श्रीशैल उन्हात खेळत असताना अचानक अस्वस्थ झाला होता. उष्णतेचा तीव्र परिणाम झाल्याने त्याला उष्माघात (हीट स्ट्रोक) झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. श्रीशैल हा त्याच गावातील सरकारी शाळेत शिक्षण घेत होता. नुकताच तो सातवी उत्तीर्ण झाला होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सध्या जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांनी उन्हात खेळणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.