Belgaum: चंदगड-बेळगाव मार्गावर बस धावणार कधी? | पुढारी

Belgaum: चंदगड-बेळगाव मार्गावर बस धावणार कधी?

बेळगाव पुढारी वृत्तसेवा: मागील वर्षभरापासून बंद असलेली बेळगाव ते चंदगड बससेवा अद्याप ठप्प आहे. सीमाबंदी उठवण्यात आली तरी अद्याप बससेवा सुरू झालेली नाही. प्रवाशांना फटका बसत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाके उभारण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहनांना प्रवेश बंद होता. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला तरी अद्याप बससेवा सुरळीत करण्यात आलेली नाही. दोन्ही राज्याच्या परिवहन मंडळांकडून बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.

चंदगड आगाराची बस शिनोळीपर्यंत धावत आहे. शिनोळीतून बस माघारी फिरत आहेत. तर बेळगाव डेपोच्या बस कुद्रेमानीपर्यंतच धावत आहेत. दोन्ही राज्याच्या परिवहन मंडळांकडून अद्याप बससेवा सुरू करण्यात आलेली नाही.

चंदगड भागातील प्रवासी शिनोळीपर्यंत येत आहेत. तेथून पुढे कुद्रेमानी बसने बेळगाव गाठत आहेत. तर बेळगाव भागातील प्रवासी शिनोळीपर्यंत बसने येत आहेत. तेथून पुढे चंदगड बसने प्रवास प्रवाशांना करावा लागत आहे.

अन्यत्र बससेवा सुरू

दोन्ही राज्यादरम्यान असणारे निर्बंध कमी करण्यात आले आहेत. बसेसना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गडहिंग्लज ते संकेश्वर व इतर मार्गावर दोन्ही राज्याच्या बस धावत आहेत. परंतु, चंदगड मार्गावर मात्र बस बंद ठेवण्यात आली आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आजरा बस सुरू

दरम्यान, अनेक दिवसापासून बंद असलेली आजरा आगाराची बस शुक्रवारी बेळगावात दाखल झाली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. परंतु, याबाबत आजरा आगाराशी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही. कोवाड, नेसरीमार्गे आज बस सुरू झाल्याने या भागातील प्रवाशांची सोय झाली आहे.

 

Back to top button