

भरपेट जेवल्यानंतर ढेकर आला, की पोट भरले असे आपण म्हणतो. मनासारखे जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर दिला, असे आपण म्हणतो. पण काही लोकांना मात्र जास्त ढेकर येतात. काहींना ते ठराविक काळानंतर सतत येतात, असे का? ( Belching)
संबंधित बातम्या
आपण जेव्हाही काही खातो किंवा पितो तेव्हा त्या पदार्थाबरोबर हवाही आत घेत असतो. ही हवा पदार्थांबरोबर पोटात गेली, की अन्नपदार्थांचे पचन सुरू झाल्यावर पोट ही हवा अन्ननलिकेमार्फत परत वर ढकलते आणि तुम्हाला आवडत नसले, तरी मोठा आवाज करत ढेकर येतात.
आपल्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देऊन पाहिल्यास सोडा असलेले किंवा सोडा पितो तेव्हा आपल्याला जास्त ढेकर येताना दिसतात. अगदी एका मागोमाग. कारण ही पेये मुळातच गॅसच्या वापरानेच बनलेली असतात. म्हणूनच ती हलवल्यावर त्यात बुडबुडे निर्माण होताना दिसतात.
जेव्हा तुम्ही घाईघाईने खाता किंवा जेवता तेव्हा प्रत्येक घासाबरोबर तुम्ही हवाही आत घेत असता. त्यामुळेही पोटात हवा जाऊन मग ढेकर येतात.
आपल्या प्रत्येकाची शरीरयष्टी जशी वेगळी तसे प्रत्येकाच्या शरीराचे कामही वेगळे. म्हणजे वायू आधारित पदार्थ सेवन केल्यानंतर प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रिया निरनिराळी असते. कोण किती हळू किंवा किती भराभर जेवतो, त्यावरही पोटात जाणार्या हवेचे प्रमाण बदलते. त्यामुळे काहींना सतत ढेकर येतात, तर काहींना कमी प्रमाणात ढेकर येतात.
सोप्या शब्दांत सांगायचे तर, शरीरातील हवेचे प्रमाण वेगवेगळे असते. जर तुम्ही कुठली औषधे घेत असाल, तर कधी कधी बद्धकोष्ठता होते, किंवा पोट जड होऊन पर्यायाने तुमच्या पोटात हवा भरते.
कधी कधी अतिढेकर देणे हे रोगाचे लक्षण असू शकते. अपेडिंक्स किंवा अल्सरच्या लक्षणांमध्येही अतिढेकर येऊ शकतात. त्यामुळे अतिढेकर येण्याच्या तक्रारीत डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक ठरू शकते.
पापणी लवणे, शिंका येणे याप्रमाणे ढेकर येणे, ही देखील नैसर्गिक क्रिया आहे. ती योग्यही आहे. ढेकर येण्यामुळे पोटातली अतिरिक्त हवा बाहेर टाकली जाते.
फक्त कल्पना करा की तुम्ही खाता-पिताना पोटात गेलेली ही हवा बाहेर पडू शकली नसती तर? ही हवा पोटातच साठून राहिली असती तर? कधीतरी पोट बिघडल्यामुळे वाईट वास आणि विचित्र आवाजातही ढेकर येतात, हे खरे आहे. काही प्रसंगी ते नकोसेही वाटते. पण पोटात साठलेल्या हवेने पोट नुसतेच फुगत गेले असते, त्यामुळे ही हवा बाहेर पडणेही तितकेच महत्त्वाचे.