Baby Skin Care | बाळांच्या त्वचेवर पुरळ किंवा अ‍ॅलर्जी आल्यास ‘हे’ करा घरगुती उपचार

Baby Skin problem
Baby Skin problem
Published on
Updated on

घरातल्या तान्हुल्याच्या त्वचेला काही झाले की, सगळेच जण काळजीत पडतात. लहान बाळांची त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर पुरळ येणे किंवा अ‍ॅलर्जी येणे खूपच सामान्य गोष्ट असते. काही वेळा आपण आजीच्या बटव्यातील घरगुती उपाय करू शकतो. काही वेळा डॉक्टरी सल्ला मोलाचा ठरतो. (Baby Skin Care)

क्रेडल कॅप ः बाळाच्या डोक्यावर जन्मल्यानंतर लगेचच तेलकट असा व्रण पाहायला मिळतो. बहुतेकदा डोक्याच्या मध्यभागी किंवा मागच्या बाजूला, कानाच्या मागे किंवा कधीतरी पापणीवर पाहायला मिळतो. या व्रणामुळे खाज येणे किंवा दाह होणे असा त्रास बाळाला होत नाही. बाळंतपणादरम्यान आईच्या शरीरातील संप्रेरकातील बदलांमुळे बाळाला हा व्रण उमटतो.

काय कराल उपचार?

या व्रणाची खपली काढू नका. असे केल्यास त्यातून रक्त येईल, शिवाय त्याचा संसर्ग इतर ठिकाणी होण्याची शक्यता असते. ऑलिव्ह ऑईल किंवा इतर क्रीम त्यावर लावा. त्यामुळे बाळाला अंघोळ घालताना तेलाबरोबर व्रणाची खपलीही निघून जाईल. मग, मऊ ब्रशने आपण ते साफ करू शकतो.

इसब किंवा त्वचारोग ः बाळांमध्ये त्वचारोगाची तीव्रता कमी-अधिक असू शकते. कंड सुटणे, बोचणे यामुळे बाळात अस्वस्थता येते. शिवाय त्वचारोग झालेली जागाही कुरूप होते. हा संसर्ग बहुतेकदा अनुवांशिकतेने आलेला असतो. यामुळे इतर संसर्गजन्य रोग होण्याचा धोका अधिक असतो. अस्थमासारखे रोग यामुळे होऊ शकतात.

उपचार कोणते? ः अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ, गोष्टींपासून बाळाला दूर ठेवा. बाळाला कोणतेही क्रीम, स्टिरॉईड असणारे क्रीम लावताना काळजी घ्या. असे क्रीम लावल्यावर बाळाच्या त्वचेवर पुरळ येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जन्मखुणा ः जन्माला येताना किंवा आल्यानंतर बाळाच्या त्वचेवर कोणतीही खूण निर्माण झाली, तर त्याला जन्मखूण असे म्हणतात. जन्मखुणेमुळे सहसा कोणालाही त्रास होत नाही. बाळ मोठे होत असताना काहीवेळा या जन्मखुणा निघून जातात. कधीतरी या जन्मखुणा आनुवंशिकतेने आलेल्या असतात.

यामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतात.

स्ट्रोक बाईट- लाल चट्टा ः रंगाने गुलाबी असा हा चट्टा असतो. सामान्यतः त्वचेसारखाच असतो. त्यामुळे आग होणे, खाज येणे असे काही त्रास होत नाहीत. बर्‍याचदा डोक्याच्या मागे, मानेवर, नाकावर, पापण्यांवर ही जन्मखूण पाहायला मिळते.

स्ट्रॉबेरी मार्क ः लालसर गुलाबी रंगाचा हा व्रण असतो. यामध्ये त्वचा थोडी जाडसर असते. बाळाच्या जन्मानंतर एक ते चार आठवड्यांत ही जन्मखूण येते. त्यानंतर वाढत्या वयाबरोबर ती वाढते. जेव्हा बाळ एक वर्षाचे होते तेव्हा खुणेची वाढ थांबते. कधी कधी वाढत्या वयाबरोबर ही खूण निघूनही जाते. बाळाचे लक्ष त्या खुणेकडे न जाऊ देणेच चांगले. म्हणजे त्या जागी खाजवणे किंवा बोचकारणे असे प्रकार टाळता येतील.

लहानग्यांच्या शरीरावर कुठेही जन्मतः लालसर व्रण असेल, तर डॉक्टरांना दाखवा. या व्रणाला स्ट्रॉबेरी मार्क असे म्हणतात. त्यातून कधी रक्त येऊ शकते किंवा ते अल्सरमध्येही रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरी सल्ला घेणे चांगले.  (Baby Skin Care)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news