

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदाबाद कसोटीच्या दुस-या दिवशीही भारतीय गोलंदाजांविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा दबदबा कायम राहिला. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी द्विशतकी भागीदारी करून इतिहास रचला आणि भारतापुढे 480 धावांचा डोंगर उभारण्यात मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाअखेर 10 षटकांत बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (17) आणि शुभमन गिल (18) हे नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
शुक्रवारी सामन्याच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने चार बाद 255 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ख्वाजा आणि ग्रीन यांनी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेटची संधी न देता पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भक्कम भागीदारी रचली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 170 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. अश्विनने ग्रीनला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही.
यानंतर ऑस्ट्रेलियाला 387 धावांवर सातवा धक्का बसला. अश्विनने मिचेल स्टार्कला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 409 धावा केल्या होत्या. चहापानानंतर पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला अक्षर पटेलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 422 चेंडूत 180 धावा करता आल्या. यानंतर नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अश्विनने मर्फी (41)ला एलबीडब्ल्यू आणि नंतर लायन (34)ला कोहलीच्या हाती झेलबाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आणला.
अश्विनने या डावात एकूण सहा विकेट घेतल्या. 32व्यांदा त्याने कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या असून भारतीय भूमीवर 26व्यांदा अशी कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्यांदा कसोटीच्या एका डावात पाच बळी मिळवण्यात अश्विनला यश आले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत 113 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनशिवाय शमीला दोन बळी मिळाले. तर अक्षर-जडेजाने प्रत्येकी एक-एक विकेट पटकावली.
चेंडूचा प्रभाव ओसरला, बॅटने आपला रंग दाखवला
चौथ्या सामन्यात खेळपट्टीचा मूड बदलताच चेंडूचा प्रभाव ओसरला आणि बॅटने आपला रंग दाखवायला. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात चार गड्यांच्या मोबदल्यात 255 धावांपर्यंत मजल मारली होती. (AUS vs IND 4th Test Day 2)
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस हेड या सलामी जोडीने हा निर्णय योग्य ठरवला आणि अर्धशतकी भागीदारी रचून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी 13 षटकांत 50 धावांचा टप्पा ओलांडला.
15.1 व्या षटकात अश्विनने हेडला माघारी धाडून भारताला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर ख्वाजा आणि हेडमध्ये 61 धावांची भागीदारी झाली. डावखुर्या हेडने 44 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. त्यानंतर 22.2 व्या षटकात शमीने मार्नस लॅबुशेनला बाद करून कांगारूंना दुसरा झटका दिला. चेंडू बॅटची कड घेऊन स्टंपला लागला. यावेळी पाहुण्या संघाची धावसंख्या 72 होती.
पहिल्या सत्रात 2 गडी गमावणार्या ऑस्ट्रेलियन संघाच्या ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने दुसर्या सत्रात टिच्चून फलंदाजी केली. या मालिकेतील हे पहिले सत्र असे होते ज्यात एकही विकेट पडली नाही. या जोडीने तिसर्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली, पण स्मिथला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही आणि तो 135 चेंडू खेळून 38 धावांवर बाद झाला. 64 व्या षटकात 151 धावसंख्येवर जडेजाने कांगारूंच्या कर्णधाराला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि क्लिन बोल्ड केले. पीटर हँड्सकॉम्बच्या रुपात ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. शमीने त्याचा त्रिफळा उय्डवला. हँड्सकॉम्ब 27 चेंडूंत 17 धावा केल्या. यावेळी कांगारूंची धावसंख्या 70.4 षटकांत 170 होती.
टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी एकमेकांच्या साथीने संयमी फलंदाजी करून महत्त्वपूर्ण धावांचे योगदान दिले. ख्वाजाशिवाय त्यांच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, मात्र त्याने तीन ट्रॅव्हिस हेड सोबत 61, स्टीव्ह स्मिथ सोबत 79 आणि कॅमेरून ग्रीन सोबत नाबाद 85 धावांच्या तीन भागीदारी केल्या.
भारताकडून शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने लॅबुशेन आणि हँड्सकॉम्बच्या रूपाने 2 बळी घेतले. उमेश यादवने 15 षटके टाकली, ज्यात त्याने 58 धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. अक्षर पटेलने केवळ 14 धावा देत 12 षटके टाकली. इकॉनॉमी रेट चांगला असूनही तो विकेट मिळवण्यात अपयशी ठरला. रवींद्र जडेजाने 20 षटकांत 49 धावा देत 1 बळी घेतला. तर अश्विनच्या खात्यात हेडची विकेट जमा झाली.
ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर रोहित शर्मा एका बदलासह मैदानात उतरला. टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला.
डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या उस्मान ख्वाजाने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने एक टोक धरले आणि भारतीय गोलंदाजांना आपली विकेट घेण्यासाठी घाम फोडला. त्याने 246 चेंडूंत आपले 14 वे कसोटी शतक पूर्ण केले. भारताविरुद्धच्या कसोटीतील हे त्याचे पहिले शतक आहे. (AUS vs IND 4th Test Day 2)
हे ही वाचा :