

पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगाबादचे 'संभाजीनगर' असे नामांतर करणारच अशी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील या सभेसाठी उपस्थित राहीले. या सभेसाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. शिवसेनेचा ३७वा वर्धापनदिन यावेळी साजरा करण्यात आला.
नाव देण्याआधी या शहराचा सर्वांगीण विकास करणार
औरंगाबादचे नाव 'संभाजीनगर' असे नामांतर करण्याचा मुद्या चर्चेत होता. यावर सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. या वेळी ते म्हणाले, "संभाजीनगर हे नाव देण्याचे वचन माझे वडील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे आणि ते मी पूर्ण करणारच. पण त्याची सुरुवात म्हणून येथील विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज असे देण्याचा ठराव विधानसभेत केला आहे, त्याला दीड वर्षं झाली आहेत." हा ठराव केंद्राकडे प्रलंबित राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देताना या शहराचा सर्वांगीण विकासही करणार असे ते म्हणाले.
पाणी प्रश्न सोडविणार
शिवसेनेचे हिंदुत्त्व म्हणजे नुसतं हिंदुत्त्व नाही तर ते विकासाचं हिंदुत्त्व आहे. हिंदुत्त्व हा आपला श्वास आहे तो खुद्द शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिला आहे. पण, मी संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडविण्यावर काम सुरु आहे. आधी १० दिवसांनंतर पाणी येत होतं, पुन्हा ते ५ दिवसांवर आलं आणि आता ते त्याहून कमी अंतरावर आले आहे. तुम्ही कोणाला हिंदुत्व शिकवत आहात ? आमच्या ह्रदयात राम पण हातात काम.. हेच आमचं हिंदुत्व आहे. खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही. मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही.
संभाजी नगरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लागेल तो निधी देण्याचे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. समांतर जलवाहिनीचे भूमीपुजन मागील वर्षी केले गेले त्याला निधी दिला जाईल. तसेच सर्वात जुनी पाणी योजना असणाऱ्या जुन्या योजनेला देखिल निधी दिला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते
यावेळी टीकाकारांचा समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पाण्यासाठी ज्यांनी आक्रोश मोर्चा काढला त्यांना पाणी प्रश्न सोडवायचा नव्हता तर सत्ता गेल्यामुळे त्यांचा जो आक्रोश होता तो त्यांनी काढला. पण, मला संभाजी नगरचे सर्व समस्या सोडवायचे आहेत आणि त्यासाठी लागेल तितका निधी देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले
विरोधकांवर त्यांनी यावेळी सडेतोड उत्तर देत टिका केल्या. "ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते" असं विधान देखील त्यांनी यावेळी केलं. विरोधकांचा आक्रोश मोर्चा हा सत्ता गेल्यानं केला जात आहे. अडीच वर्ष झाले तरीही मविआ सरकार पडत नाही यामुळे विरोधक अस्वस्थ आहेत. रोज सरकार पडणार पडणार अशी स्वप्न विरोधकांना पडत आहेत.
पुढे ते असंही म्हणाले की, भाजपच्या प्रवक्त्यानं मोहम्मद प्रेषित यांचा अवमान केला. या अवमानामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की झाली. पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावण्यात आला. भाजपच्या अशा टिनपाट प्रवक्त्यांमुळं देशावर नामुष्की ओढवली गेली. भाजप सुपारी देऊन भोंगा आणि चालिसा वाचून घेत आहे.
राज्यातल्या गडकिल्ल्यांचं जतन होत आहे. मंदिरांचे सवर्धन केलं जात आहे. हे हिंदूत्व नाही का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. २५ वर्ष जे मांडीवर होते ते आता उरावर बसले आहेत. जे वैरी होते ते मित्र झाले, जे मित्र होते ते हाडवैरी झाले आहेत, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की, खाजगी कंपन्यांसाठी असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपवर टिका केली. निवडणूका आल्या की भाजप पक्ष अफुची गोळी देतो. देशात महागाई वाढत आहे. पेट्रोलचे दर इतके का वाढले आहेत. अच्छे दिन कब आयेंगे असे केंद्र सरकारला विचारा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी जनतेला केले. कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदूस्थान आणि महाराष्ट्र माझा. असं उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलं.
हेही वाचा