

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय प्राणी कल्याण मंडळ 14 फेब्रुवारीला काऊ हग डे म्हणून नामकरण करू इच्छित आहे. मंडळाकडून 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन केले आहे. गाईला मिठी मारून, आलिंगन देऊन हा दिवस साजरा करा, असे म्हटले आहे.
मंडळाचे सचिव एस के दत्ता यांनी स्वाक्षरी केलेल्या अपिलात भारतीय प्राणी कल्याण मंडळाने म्हटले आहे की,गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जीवन टिकवते आणि पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. "मातेप्रमाणे पोषण करणारी, सर्वांची देणगी देणारी, मानवतेला ऐश्वर्य प्रदान करणारी असल्यामुळे तिला कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चात्य सभ्यतेच्या चकाचकतेने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे," अधिकृत आवाहनात म्हटले आहे. Cow Hug Day
भारतीय प्राणी कल्याण मंडळ 14 फेब्रुवारीला काऊ हग डे म्हणून नामकरण करू इच्छित आहे आणि त्यांनी लोकांना गायींना आलिंगन देण्याचे आवाहन केले आहे आणि दावा केला आहे की यामुळे "भावनिक समृद्धी" येईल आणि "वैयक्तिक आणि सामूहिक आनंद" वाढेल.
एकीकडे मंडळाने व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत काऊ हग डे साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे शेतक-यांनी नुकतेच लम्पी सारख्या त्वचेच्या आजारामुळे हजारो गायींचा मृत्यू झाला असताना मंडळाने त्यांना मदत केली नाही, असा आरोप केला आहे. तसेच गायींना मिठी मारा म्हणजे काय असा प्रश्न ही त्यांनी बोर्डाला विचारला आहे.
डेअरी फार्मर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नेते दयाभाई गजेरा यांनी सांगितले की, एकट्या गुजरातमध्ये हजारो गायी त्वचेच्या आजारामुळे मरण पावल्या आहेत. "आमच्या गायी नुकत्याच मेल्या तेव्हा AWBI कुठे होती? आम्हाला नुकसानभरपाई म्हणून काहीही मिळालेले नाही. दुधाचे उत्पादन सुमारे 15 ते 20% कमी झाले आहे,"
गजेरा म्हणाले. "ते गायींवर दाखवलेले प्रेम खोटे आहे. जर त्यांना खरोखरच गुरांना आधार द्यायचा असेल तर त्यांनी दुग्धव्यवसाय करणार्यांना आधार दिला पाहिजे आणि गायींवरील लम्पी सारख्या त्वचेच्या आजारामुळे झालेले आमचे नुकसान भरून काढले पाहिजे, असेही ते म्हणाले.