अनिल जयसिंघानीची १०० कोटींची मालमत्ता : ईडी तपासातून माहिती उघड

अनिल जयसिंघानीची १०० कोटींची मालमत्ता : ईडी तपासातून माहिती उघड
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांसह बुकींची माहिती देण्याची ऑफर देत व्हिडिओ क्लिप्स, ऑडिओ आणि अन्य मेसेज पाठवून १० कोटींच्या खंडणीसाठी धमकावले. या प्रकरणातील आरोपी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याने १०० कोटी रुपयांहून अधिकची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली आहे. गुजरातमधील एका क्रिकेट सट्टेबाजीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करत असून या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ईडीतील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, अनिल जयसिंघानी याच्या बहुतांश मालमत्ता हॉटेल, फ्लॅट, दुकाने, जमीन आणि अन्य स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहेत. स्वतः अनिल जयसिंघानी, त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे सहकारी यांची अनेक बँक खातीही उघडकीस आली आहेत. ज्यात कोट्यवधींचा बेहिशेबी पैसा जमा करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने आता या मालमत्तांबाबत सखोल तपास सुरू केला आहे.

ठाण्यातील उल्हासनगरचा रहिवासी असलेला अनिल जयसिंघानी हा क्रिकेट स्पर्धांमध्ये हजारो कोटींची सट्टेबाजी करतो. अशाच एका आयपीएलशी संबंधीत दोन हजार कोटींच्या क्रिकेट बेटिंग आणि अफ्रोझ फट्टा याचा सहभाग असलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा ईडीचे अहमदाबादमधील पथक तपास करत आहे. फट्टाचे सट्टेबाजांशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्याने सट्टेबाजीचे पैसे दुबईत आणि दुबईतून भारतात हजारो कोटींमध्ये लॉंड्रिंग करण्यास मदत केली.

ईडीचे तत्कालीन सहसंचालक जे. पी. सिंग तपासाचे नेतृत्व करत होते. पण, नंतर सिंग आणि त्यांच्या कनिष्ठांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरी प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सीबीआयने याप्रकरणी क्रिकेट बुकी सोनू जालान आणि बिमल अग्रवाल यांनाही मुंबईतून अटक केली होती. दरम्यान, काही बुकींनी आपल्याला लाचखोरीच्या प्रकरणात अडकवल्याचा दावा सिंग यांनी केल्याचे समजते.

अनिल जयसिंघानी हा याप्रकरणानंतर पसार झाला. तो २०१५ पासून वॉन्टेड आरोपी होता. अहमदाबाद न्यायालयानेही त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या अनिल जयसिंघानी याचा ताबा घेऊन ईडीने त्याला अटक केली आहे.

अहमदाबाद उच्च न्यायालयाने अनिल जयसिंघानी याला ईडी कोठडी सुनावली असून ईडीचे अधिकारी त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. अनिल जयसिंघानी याचे मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर आणि दुबई असे पसरलेले क्रिकेट बेटिंगचे नेटवर्क, त्याचे सट्टेबाजीतील अन्य साथीदार यांचा ईडी शोध घेत आहे.

फॅशन डिझायनर म्हणून अमृता फडणवीस यांची भेट घेत ओळख वाढवून अनिक्षा जयसिंघानी हिने आपल्या वडिलांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी त्यांना १ कोटींची ऑफर दिली होती. पुढे अमृता फडणवीस यांना २२ व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स, मेसेज पाठवून १० कोटींच्या खंडणीसाठी धमकावले. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानी आणि त्याची फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षा विरोधात २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला. मलबार हिल पोलिसांनी तपास करत १६ मार्चला अनिक्षाला उल्हासनगरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. मुलीच्या अटकेनंतर अनिल जयसिंघानी याने समोर येत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या होत्या.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news