पुढारी वृत्तसेवा
हिवाळा म्हटलं की पर्यटन आलंच. मात्र सर्वांनाच गर्दी आवडते असे नाही. काहींजण निसर्गाचे शांत रुप अनुभवण्यासाठी पर्यटन करतात. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे हिवाळा हा 'उत्सव' म्हणून नाही तर 'शांतता' म्हणून अनुभवता येतो. जाणून घेवूया अशा सात 'चौकटी'बाहेरील ठिकाणांविषयी...
तीर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश : 'ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क'च्या कुशीत वसलेली तीर्थन व्हॅली अत्यंत शांत पर्यटन स्थळ आहे. मर्यादित निवास व्यवस्था आणि संरक्षित वनक्षेत्रामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी नसते.
कल्पा, हिमाचल प्रदेश : सतलज नदीच्या खोऱ्यात वसलेल्या कल्पा हे आकाश आणि हिमालयाची उंच शिखरे पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कडाक्याची थंडी असूनही, येथील होमस्टे आणि वर्षभर सुरू असतात.
चोपता, उत्तराखंड : चोपता हे तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेकचा पायथा म्हणून प्रसिद्ध असले तरी, हिवाळ्यात येथे ट्रेकर्सची गर्दी कमी झाल्याने शांतता अनुभवता येते. मोठी हॉटेल्स किंवा बाजारपेठा नसल्यामुळे, निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी हे एक शांत नंदनवन ठरते.
मुन्सियारी, उत्तराखंड : भारत-तिबेट सीमेजवळ असलेले मुन्सियारी पंचाचुली येथे हिवाळ्यात बर्फामुळे रस्ते वाहतूक मर्यादित असते. हे ठिकाण शांततेचा अनुभव घेण्यासाठी अविस्मरणीय ठरते.
झिरो व्हॅली, अरुणाचल प्रदेश : कोणताही गाजावाजा किंवा उत्सवांचा गोंधळ नको असेल, तर हिवाळ्यात झिरो व्हॅलीला नक्की भेट द्यावी. अपातानी पठारावरील हिरवळ आणि धुक्यात हरवलेली पहाट एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातील चित्रासारखी वाटते.
केरळ येथील वरकलाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असलेले एडवा, कप्पील आणि ओदायम हे भाग आजही शांत आहेत. पापनाशम बीचवरील शांतता आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
मरारीकुलम, केरळ : येथे नाईटलाईफ किंवा पार्ट्यांची संस्कृती नसल्यामुळे केवळ शांतता शोधणारे पर्यटक येथे येतात. लांबच लांब समुद्रकिनारे, मासेमारी करणाऱ्यांची दैनंदिन लगबग आणि रात्रीचे ताऱ्यांनी भरलेले आकाश अनुभवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.