पुढारी वृत्तसेवा
दारू पिल्यानंतर श्वासाला येणारा वास इतका तीव्र असतो की, एखाद्या व्यक्तीने मद्यपान केले आहे की नाही, हे समोरच्या व्यक्तीला सहज समजते.
दारूचा वास हा थेट फुफ्फुसांतून श्वासाद्वारे बाहेर पडतो. त्यामुळे ब्रश केला तरी हा वास बराच वेळ टिकून राहतो.
अल्कोहोल घेतल्यानंतर शरीरात नेमक्या कोणत्या प्रक्रिया घडतात याचे वैज्ञानिक कारण समजून घेऊया.
जेव्हा अल्कोहोल पोटातून रक्तप्रवाहात पोहोचते, तेव्हा यकृत (Liver) त्याचे विघटन करण्यास सुरुवात करते. यकृतामधील अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) हे एन्झाइम अल्कोहोलचे रूपांतर 'अॅसिटाल्डिहाइड'मध्ये करते.
अॅसिटाल्डिहाइड हे अत्यंत उग्र वासाचे रसायन आहे. हे संयुग रक्तातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचते आणि श्वासावाटे बाहेर पडताना दुर्गंधी निर्माण करते.
अल्कोहोलमुळे तोंड कोरडे पडते (Dehydration). तोंडातील लाळ कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि अल्कोहोलमधील रसायनांचे विघटन करून सल्फरयुक्त वायू तयार करतात, ज्यामुळे दुर्गंधी अधिक वाढते.
दारु पिल्यानंतर अॅसिटाल्डिहाइड आणि इतर उप-उत्पादने फुफ्फुसांवाटे बाहेर टाकली जातात. श्वास सोडताना जो तीव्र वास येतो, त्यालाच वैज्ञानिक भाषेत 'अल्कोहोलिक ब्रीथ' असे म्हणतात.
अल्कोहोलची रसायने रक्तात विरघळलेली असतात. ती केवळ श्वासातूनच नाही, तर घामावाटे त्वचेच्या छिद्रांतूनही बाहेर पडतात. म्हणूनच मद्यपान केलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना आणि शरीरालाही वास येतो.
व्हिस्की, रम आणि रेड वाईन यांसारख्या गडद रंगाच्या मद्यांमध्ये 'कंजेनर्स' (Congeners) जास्त असतात, ज्यामुळे वास अधिक तीव्र येतो.
भरपूर पाणी पिणे, च्युइंगम चघळणे, दात घासणे किंवा पुदिन्याची पाने खाण्यामुळे तात्पुरता फरक पडू शकतो. परंतु, जोपर्यंत शरीर अल्कोहोलचे पूर्णपणे चयापचय (Metabolism) करत नाही, तोपर्यंत श्वासातील हा नैसर्गिक वास पूर्णपणे जात नाही.