पुढारी वृत्तसेवा
चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून, आज बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. येथे कधीही शंख फुंकला जात नाही? जाणून घ्या यामागचे रहस्य...
शंख हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो, तरीही त्यांच्याच परम धामात शंखनाद करणे वर्ज्य आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत.
पौराणिक कथेनुसार, देवी लक्ष्मी तुळशी भवनात ध्यान करत होत्या. त्यावेळी विष्णूंनी शंखचूर्ण राक्षसाचा वध केला, पण लक्ष्मीजींचे ध्यान भंग होऊ नये म्हणून त्यांनी विजयोत्सवाचा शंख वाजवला नाही.
दुसऱ्या कथेनुसार, अगस्त्य ऋषी राक्षसांचा वध करत असताना 'वातापी' नावाचा राक्षस जीव वाचवण्यासाठी शंखात जाऊन लपला. शंख वाजवल्यास तो बाहेर पळून जाईल, या भीतीने येथे शंख वाजवणे बंद झाले.
असे मानले जाते की, बद्रीनाथ परिसरात सापांचे वास्तव्य आहे. शंखाचा आवाजामुळे ते क्रोधित होऊन नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते अशी मान्यता आहे.
बद्रीनाथ हे उंचावर आणि डोंगराळ भागात वसलेले आहे. शंखाच्या विशिष्ट ध्वनी लहरी डोंगरांवर आदळून मोठा अनुनाद निर्माण करू शकतात.
वैज्ञानिकांच्या मते, आवाजामुळे निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे बर्फात भेगा पडू शकतात. यामुळे हिमस्खलन होण्याचा धोका वाढतो.
अशा प्रकारे भक्ती, पौराणिक कथा आणि विज्ञानाचा मेळ घालत बद्रीनाथ धाममध्ये आजही शंख न वाजवता शांततेत भगवान नारायणाची उपासना केली जाते.