पुढारी वृत्तसेवा
जेव्हा पार्टी किंवा मैफल जमते तेव्हा तेव्हा 'स्मॉल' किंवा 'लार्ज' पेग हे शब्द हमखास कानावर पडतात.
दारुचा पेग ३० किंवा ६० मिलीचाच का असतो? 'PEG' या शब्दाचा नक्की अर्थ काय? जाणून घेवूया यामागील रंजक इतिहास आणि शास्त्रीय कारण....
'PEG' हे प्रत्यक्षात एका वाक्याचे लघुरूप आहे. त्याचा पूर्ण अर्थ 'Precious Evening Glass' (मौल्यवान संध्याकाळचा पेला) असा होतो.
जुन्या काळात ब्रिटनमधील कोळसा खाणीतील कामगार दिवसभर प्रचंड कष्ट करायचे. सायंकाळी थकवा घालवण्यासाठी त्यांना मद्याचा एक पेला दिला जात असे.
कामगारांना दिला जाणारा हा अत्यंत 'मौल्यवान' मानला जायचा.यातूनच त्याला 'प्रेशियस इव्हनिंग ग्लास' म्हटले जाऊ लागले, ज्याचे पुढे संक्षिप्त रूप 'पेग' झाले.
दारुच्या एका पेगचे माप ६० मिली असण्यामागे मानवी शरीराची पचनसंस्था आणि यकृत (Liver) यांचा थेट संबंध आहे.
दारु पिल्यानंतर ती थेट रक्तात मिसळते. यकृत हे रक्तातील अल्कोहोल फिल्टर करण्याचे काम करते. शास्त्रानुसार, एका निरोगी व्यक्तीचे यकृत एका तासात साधारणपणे ३० मिली स्पिरीट (व्हिस्की, व्होडका, रम इ.) पचवू शकते.
६० मिली दारुचे सेवन केले तर यकृताला ते पचवण्यासाठी सुमारे २ तास लागतात. हे माप अशा प्रकारे निश्चित केले आहे की, यकृताला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. हे प्रमाण पाळले नाही आणि अतिप्रमाणात मद्यपान केले, तर यकृतावर ताण येतो आणि 'अल्कोहोल पॉयझनिंग'चा धोका संभवतो.
भारतात आपण लिटर आणि मिलीलिटर वापरतो; परंतु मद्याच्या मापाची पेग ही पद्धत ब्रिटीश व्यवस्थेतून आली आहे. तिथे द्रव पदार्थ 'औंस' (Ounce) मध्ये मोजले जातात. याच कारणामुळे जगभरात आणि विशेषतः भारतात 'स्मॉल पेग' १ औंस (३० मिली) आणि 'लार्ज पेग' २ औंस (६० मिली) ठेवण्यात आला आहे.
दारुचे ३० किंवा ६० मिलीचे हे माप शरीराच्या मर्यादेचा विचार करून ठरवले गेले आहे. यकृत हे एका यंत्रासारखे आहे आणि त्याला प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच दारु अमर्याद प्यायल्यास ती शिक्षा ठरते, याची जाणीव नेहमी ठेवावी.
(टीप: संबंधित मजकूर हा केवळ माहितीसाठी आहे. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. आम्ही मद्यपानाचे समर्थन करत नाही.)