Rahul Shelke
बजेट सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना लोकसभेत अचानक गोंधळ झाला. कारण होते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण.
राहुल गांधी भाषणात राष्ट्रीय सुरक्षा आणि चीनचा मुद्दा मांडत होते. डोकलाममधील घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला सवाल केला.
भाषणादरम्यान राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. ते त्या पुस्तकातील काही ओळी वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, डोकलाम वादाच्या काळात चीनी टँक भारताच्या हद्दीजवळ आले होते.
ही माहिती त्या पुस्तकात नमूद असल्याचा दावा त्यांनी केला.
हा उल्लेख होताच सत्ताधारी बाकांवरून जोरदार विरोध झाला. भाजप खासदारांनी “खोटी माहिती” असल्याचा आरोप केला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उभे राहिले. ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, ते अद्याप प्रकाशितच झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले, ही माहिती एखाद्या मॅगझिनमधून आलेली असू शकते. “मॅगझिन काहीही छापू शकते,” असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधी म्हणाले, त्यांचा स्रोत पूर्णपणे खरा आणि विश्वासार्ह आहे. सरकारला भीती नसेल, तर हे वाचण्यास विरोध का, असा सवाल त्यांनी केला.
गोंधळ वाढताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप केला. अप्रकाशित किंवा अप्रमाणित मजकूर वाचण्यास मनाई असल्याचे त्यांनी सांगितले.
वाद आणि गोंधळ वाढतच गेला. अखेर लोकसभेची कार्यवाही काही काळासाठी तहकूब करण्यात आली.