पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम डाएट आणि व्यायाम सुरु केला जातो;पण सर्वांनाच झटपट रिझल्ट मिळत नाही.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहलीचे न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी सांगितले की, सर्वप्रथम सलग ३० दिवस आपण काय खातो, याची सविस्तर नोंद (फूड डायरी) ठेवा. ३० दिवसांनंतर नेमकी चूक लक्षात येईल.
एकावेळी किती खायचे हे ठरवा.उदा. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण २०० ग्रॅम. त्यानंतर हळूहळू अन्नाचे प्रमाण कमी करण्याची सवय लावा, असा सल्ला फर्नांडो देतात.
आहारतज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी फायबरने समृद्ध आहाराचा जेवणात समावेश करा. दर १,००० कॅलरींमागे सुमारे १० ग्रॅम फायबर घेणे फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक आहे. ते स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अति खाणे टाळता येते.
चालणे, लिफ्टऐवजी जिने वापरणे, नृत्य, बागकाम अशा उपक्रमांचा अवलंब करा. आठवड्यात किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणे आवश्यक आहे.
स्नायू जितके मजबूत तितका मेटाबॉलिझम वेगवान राहतो. शरीर अधिक कॅलरी जाळते.आठवड्यात किमान दोन दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम करावेत. यासोबतच चालणे, धावणे किंवा पोहणे यांसारखे एरोबिक व्यायामही करावेत.
सतत तणावात राहिल्यामुळे ‘इमोशनल ईटिंग’ वाढते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तणाव नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.