पुढारी वृत्तसेवा
'चालणे' हा व्यायामाचा सर्वात लोकप्रिय प्रकार असला तरी, केवळ चालण्याने अपेक्षित तंदुरुस्ती मिळत नसल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
चांगल्या आरोग्यासाठी चालण्यासोबतच स्नायू बळकट करणारे व्यायाम (स्ट्रेंथ ट्रेनिंग) करणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
'पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स' नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सुमारे ३.९६ लाख प्रौढांच्या सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
संशोधनात शहरी आणि ग्रामीण भागातील व्यायामाच्या पद्धतींमध्ये तफावत दिसून आली आहे.
शहरात राहणारे लोक चालण्यासोबतच धावणे, वेटलिफ्टिंग आणि डान्स करणे पसंत करतात.
नियमित चालणाऱ्यांपैकी केवळ २५ टक्के लोकच स्नायू बळकट करण्याच्या (Muscle-strengthening) निकषांची पूर्तता करतात.
संशोधनानुसार, प्रौढ व्यक्तीला आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम (उदा. वेगाने चालणे) आणि किमान २ दिवस स्नायू बळकट करण्याचे व्यायाम करणे आवश्यक आहे.
वेळेअभावी व्यायाम करू न शकणाऱ्यांसाठी संशोधकांनी 'एक्सरसाइज स्नॅक्स' हा पर्याय सुचवला आहे. यात दिवसभरातून अधूनमधून १ ते ५ मिनिटे जिने चढणे, वेगाने चालणे किंवा जंपिंग जॅक करणे अपेक्षित आहे.