best dinner time health |रात्री ७ की ९? जेवणाची 'ही' एक चूक आरोग्यावर पडू शकते भारी!

पुढारी वृत्तसेवा

एम्स (AIIMS), हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षित आणि कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत असलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये रात्रीच्‍या जेवणाच्‍या वेळेबाबत महत्त्‍वपूर्ण माहिती दिली आहे.

डॉ. सेठी यांच्या मते, मानवी शरीर एका अंतर्गत घड्याळावर चालते, ज्याला 'सर्काडियन रिदम' म्हणतात. हे घड्याळ केवळ झोपेवरच नाही, तर पचन, संप्रेरके (हॉर्मोन्स) आणि चयापचय यांवरही नियंत्रण ठेवते.

रात्री उशिरा जेवण म्‍हणजे शरीराला एकाच वेळी दोन विरुद्ध कामे करण्यास सांगणे. अन्न पचवणे आणि विश्रांतीची तयारी करणे. हा संघर्ष शरीरातील अनेक यंत्रणांमध्ये अडथळा निर्माण करतो.

तुम्ही रात्री ९:३० वाजता जेवायला बसलात. तुमचे अन्न आरोग्यदायी असले तरी, तुमचे शरीर संध्याकाळच्या तुलनेत त्यावर प्रक्रिया करू शकत नाही.

डॉ. सेठी सांगतात की, रात्री उशिरा जेवल्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलतेत ३०-४०% घट होते.चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते.

पचन आणि झोपेचे संप्रेरक (मेलाटोनिन) यांच्यात असंतुलन निर्माण होते.

यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात जडपणा, गॅस किंवा पोट फुगल्यासारखे वाटणं, थकवा असा त्रास जाणवू शकतो.

जेवण लवकर केले तर रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी १५% कमी राहते.

रात्रीचे जेवण केवळ २ ते २.५ तास लवकर केल्यानेही आरोग्यात लक्षणीय फरक पडू शकतो.

डॉ. सेठी यांच्या मते, मधुमेह (Diabetes), प्री-डायबिटीज आणि फॅटी लिव्हर असलेल्यांनी रात्री उशिरा जेवण केल्यास रक्तातील साखरेची पातळी ३०-५०% जास्त वाढू शकते.

शरीराच्या नैसर्गिक चक्रानुसार चाला. शक्यतो रात्री ७ ते ८ च्या दरम्यान जेवण संपवण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

येथे क्‍लिक करा.