अंजली राऊत
पूर्व युरोप आणि मध्य आशियातील गवताळ प्रदेशमध्ये प्रजननभूमी असलेला आणि जागतिक स्तरावर संकरग्रस्त ठरत चाललेला शबल ससाणा इंदापूर तालुक्यातील भिगवण-कडबनवाडी वनक्षेत्रात दिसू लागला आहे.
शबल ससाणा हा भारतात हिवाळी पाहुणा म्हणून ओळखला जातो. त्याची प्रजननस्थळे पूर्व युरोप व मध्य आशियात असून हिवाळ्यात तो भारतीय उपखंडात स्थलांतर करतो.
शबल ससाण्याची मादी तपकिरी रंगाची असते, तर नर फिकट करड्या रंगाचा असतो. राज्यात हा ससाणा काही ठिकाणी अधूनमधून दिसतो.
भिगवण आणि वीर धरण परिसर हा त्याच्या उपस्थितीसाठी ओळखला जातो. मात्र, कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशात त्याचे स्पष्ट दर्शन होणे ही पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाची नोंद मानली जात आहे.
जागतिक निसर्ग संरक्षण संघटना यांच्या अहवालानुसार शबल ससाणा 'संकरग्रस्त' प्रजातींमध्ये मोडतो. प्रजनन क्षेत्रातील गवताळ प्रदेशांचे घटते क्षेत्रफळ, शेतीतील रासायनिक फवारण्या, अधिवासातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे या ससाण्यांच्या संख्येत घट होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट होत आहे.
शबल ससाण्याबरोबरच अमूर ससाणा, सरडमार भोवत्या, नेपाळी गरुड, मोठ्या ठिपक्यांचा गरुड आदी स्थलांतरित शिकारी पक्ष्यांनी कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशात मांदियाळी जमवली आहे.
कडबनवाडीच्या गवताळ भागातील मोकळे गवताळ क्षेत्र, लहान सस्तन प्राणी आणि अन्नसाखळीची उपलब्धता यामुळे शिकारी पक्ष्यांसाठी हा परिसर अनुकूल आहे.