पुढारी वृत्तसेवा
अपुरी झोप आणि स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) यांचा जवळचा संबंध असल्याचे आजवर अनेक अभ्यासांतून समोर आले आहे.
अमेरिकेतील केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, स्मृतिभ्रंशाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 13 टक्के प्रकरणांचे मूळ निद्रानाशात असण्याची शक्यता आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मेमरी अँड एजिंग सेंटरने संशोधनात ४,६०० प्रौढांचा मागील १९ वर्षांच्या जीवनशैलीचा मागोवा घेतला.
संशोधनात असे आढळले की, झोपेचा कालावधी हा एखाद्या व्यक्तीला डिमेंशिया होईल की नाही, याचा अचूक अंदाज लावू शकत नाही.
मात्र झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती आपले कार्य, नातेसंबंध, रोगप्रतिकारशक्ती आणि अगदी भूकेवरही परिणाम करते.
जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपला मेंदू एका अर्थाने 'स्वच्छ' करत असतो. अल्झायमर रोगासाठी कारणीभूत ठरणारी विषारी प्रथिने झोपेतच मेंदूतून बाहेर काढली जातात.
तज्ज्ञांच्या मते केवळ अपुरी झोप नाही, तर विशिष्ट 'स्लीप डिसऑर्डर' मेंदूवर परिणाम करतात.
आरईएम स्लीप बिहेविअर डिसऑर्डर हा एक दुर्मिळ विकार आहे. या विकाराची लक्षणे पार्किन्सन आणि 'लेवी बॉडी डिमेंशिया'चे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
डिमेंशियामुळे मेंदूची कार्यक्षमता अधिकच खालावते. त्यामुळे मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी शांत झोप आवश्यकच.