पुढारी वृत्तसेवा
प्रथिनं (प्रोटीन) हे आपल्या आहारातील एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे. मात्र याचा आहारात किती समावेश असावा याबद्दल अनेक गैरसमज आहेत.
वजन कमी करण्यासाठी औषधे घेणाऱ्यांना अधिक प्रथिनं घेण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण सांगताना तज्ज्ञ स्पष्ट करतात की, ही औषधे भूक कमी करतात, ज्यामुळे नकळत प्रथिनांचे सेवन कमी होते.
आजवरच्या अनेक संशोधनात स्पष्ट झाले की, संप्रेरकांचे (हॉर्मोन्स) नियमन, शरीराची झीज भरून काढणे, पचनसंस्था आणि स्नायूंची मजबुती यांसारख्या अनेक कार्यांसाठी प्रथिनं अत्यंत आवश्यक आहेत.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण आणि स्नायू कमी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
अनेकांचा समज असतो की, मासे किंवा मांस हेच प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. आहारतज्ज्ञ हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करतात.
शाकाहारी पदार्थ सोया (टोफू, टेम्पेह), क्विनोआ, बकव्हीट (कुटकी), हेम्प सीड्स आणि चिया सीड्स हे शाकाहारी पदार्थ 'पूर्ण प्रथिनं' आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, तृणधान्ये आणि सुका मेवा यांच्या मिश्रणातून शरीरला आवश्यक असलेली सर्व नऊ अमिनो ॲसिड्स सहज मिळवता येतात.
आहारातून प्रथिनांची गरज पूर्ण होत नसेल, तर प्रोटीन शेक किंवा पावडर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, प्रोटीन शेक हे नैसर्गिक आहाराला पर्याय असू शकत नाहीत; ते केवळ आहाराला पूरक म्हणून वापरावेत.
प्रथिनं आरोग्यासाठी चांगली असली, तरी त्यांचे अतिसेवन घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा जास्त प्रथिनं घेतल्यास:किडनीवर ताण येऊ शकतो. प्रक्रिया केलेल्या प्रथिनांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
सामान्यतः व्यक्तीच्या निरोगी वजनानुसार प्रति किलो वजनाला 0.75 ते 1.0 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. वय आणि शारीरिक हालचालींनुसार हे प्रमाण बदलू शकते.
प्रौढ व्यक्तींनी (ज्यांना किडनीचे विकार नाहीत) प्रति किलो वजनाला 1 ते 1.2 ग्रॅम प्रथिनांचे उद्दिष्ट ठेवावे, असे तज्ज्ञ सूचवतात. मात्र आहारात कोणताही बदल करताना नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.