पुढारी वृत्तसेवा
मानसिक शांततेसह आरोग्यासाठी जगभरात ध्यानाचे (Meditation) महत्त्व आहे.
'असोसिएशन फॉर सायकोलॉजिकल सायन्स'मध्ये प्रकाशित संशोधनाने ध्यानाच्या 'दुसऱ्या बाजू'वर प्रकाश टाकला आहे.
काही व्यक्तींमध्ये ध्यानामुळे चिंता, विसंगती आणि दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होण्यासारखे अनपेक्षित दुष्परिणाम दिसून येत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
मेलबर्न विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ निकोलस व्हॅन डॅम आणि त्यांच्या टीमने केलेल्या अभ्यासात असे आढळले की, ६०% ध्यान करणाऱ्यांना कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागला. सुमारे एक तृतीयांश लोकांनी हे अनुभव त्रासदायक असल्याचे सांगितले.
"कोणतेही नवीन उपचार विकसित करताना सुरुवातीलाच संशोधन केले जाते, परंतु 'माइंडफुलनेस'च्या (Mindfulness) बाबतीत तसे झाले नाही," असे निकोलस व्हॅन डॅम यांनी स्पष्ट केले आहे.
संशोधनानुसार, ध्यानामुळे काही व्यक्तींमध्ये पॅनिक अटॅक, जुन्या वेदनादायक आठवणी जागृत होणे, किंवा स्वतःच्या शरीरापासून विलग झाल्याची भावना निर्माण होणे असे गंभीर परिणाम दिसू शकतात.
विविध अभ्यासांमध्ये हे प्रमाण १ ते ६६ टक्क्यां पर्यंत भिन्न असल्याचे समोर आले होते. ही विसंगती दूर करण्यासाठी व्हॅन डॅम यांनी ९०० प्रौढ व्यक्तींवर सर्वसमावेशक अभ्यास केला.
या अभ्यासासाठी संशोधकांनी ३० मुद्द्यांची एक सूची (Checklist) तयार केली होती. संशोधनात आढळले की, ६० टक्के सहभागींना किमान एका दुष्परिणामाचा अनुभव (उदा. अस्वस्थता किंवा शरीराची जाणीव हरवणे) आला.
३० टक्के सहभागींनी ध्यानाचा अनुभव अत्यंत आव्हानात्मक किंवा त्रासदायक असल्याचे सांगितले. तर ९ टक्के सहभागींना ध्यानाच्या दुष्परिणामांमुळे त्यांच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम झाला.
ज्या व्यक्तींना ध्यानापूर्वी ३० दिवसांत मानसिक त्रासाचा अनुभव आला होता, त्यांच्यात दुष्परिणाम दिसण्याची शक्यता जास्त होती, असेही संशोधनात स्पष्ट झाले.
'रेसिडेन्शिअल रिट्रीट'सारख्या सलग आणि दीर्घकाळ मौन पाळून केल्या जाणाऱ्या ध्यानामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.
लोकांनी ध्यानाला घाबरावे किंवा ते करू नये. उलट, शस्त्रक्रिया किंवा इतर उपचारांप्रमाणेच ध्यानाबाबतही लोकांना संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना दिली जाणे आवश्यक आहे," असे व्हॅन डॅम यांनी नमूद केले आहे.
"ध्यान ही प्रक्रिया प्रत्येकासाठीच फायदेशीर असेल असे नाही. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही काही चुकीचे करत आहात असा नाही, तर कदाचित ते तुमच्यासाठी योग्य नसेल," असा मोलाचा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.