पुढारी वृत्तसेवा
कॅनडा आणि अमेरिका देशांच्या सीमेवर वसलेला जगातील प्रसिद्ध आणि भव्य नायगरा धबधबा गोठल्याचा व्हिडिओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे.
हिवाळ्यात नायगरा धबधब्याचा पाण्याचा प्रवाह इतका वेगवान असतो की, तो पूर्णपणे कधीच गोठत नाही. मात्र, थंड वाऱ्यामुळे धबधब्यातील धुक्याचे झाडांवर, रेलिंगवर आणि पायवाटेवर जाड बर्फाच्या थरात रूपांतर होते. यामुळे पाणी वाहत असूनही आजूबाजूचा संपूर्ण परिसर 'स्टॅचू' झाल्यासारखा दिसतो.
'ध्रुवीय भोवरा' (आर्क्टिक क्षेत्रातील अत्यंत थंड हवा खाली दक्षिणेकडे सरकते) सक्रिय होतो तेव्हा तापमान -२०°C च्या खाली जाते. तीव्र थंडीमुळे घाटाच्या कड्यांवर आणि पर्यटकांच्या मार्गांवर बर्फाचे डोंगर तयार होतात.
तुम्हाला नायगराचे 'बर्फाळ' रूप पाहायचे असेल, तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने सर्वात योग्य आहेत. या काळात बर्फ, धुके आणि थंडी धबधब्याला वेगळेच सौंदर्य प्रदान करते.
बर्फाच्छादित नायगरा धबधबा पाहण्यासाठी कॅनडा आणि अमेरिकन अशा दोन्ही बाजूंनी सोय आहे.
हिवाळ्यात 'नायगारा स्कायव्हील'च्या उबदार केबिनमधून धबधब्याचे विहंगम दृश्य पाहणे आणि स्थानिक 'लाईट फेस्टिव्हल्स'चा आनंद घेणे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.
नोव्हेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत येथे 'विंटर फेस्टिव्हल ऑफ लाईट्स' साजरा होतो. लाखो दिव्यांच्या रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी हा बर्फाळ प्रदेश एखाद्या स्वप्नभूमीसारखा दिसतो.
हिवाळ्यातील नायगाराची सफर जेवढी सुंदर तेवढीच आव्हानात्मक असते. पर्यटकांना येथे थर्मल कपडे आणि उबदार जॅकेट्स अनिवार्य आहेत. रस्ते निसरडे असल्याने उत्तम ग्रिप असलेले बूट आवश्यक ठरतात.