पुढारी वृत्तसेवा
बलुचिस्तान हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. हा प्रांत दीर्घकाळापासून संघर्षाच्या विळख्यात आहे.
पाकिस्तानमधील बंडखोर गट 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'ने (BLA) 'फिदायीन' (आत्मघाती हल्लेखोर) तरुणी हवा बलोच हिचा व्हिडिओ जारी केला आहे. ती बलुचिस्तानमध्ये झालेल्या मोठ्या हल्ल्यात सहभागी होती.
बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) खारान, मस्तुंग, क्वेटा आणि नोशकीसह अनेक भागात ४० तास 'ऑपरेशन हेरॉफ फेज-२' राबवले. या कारवाईत १८ 'फिदायीन' (आत्मघाती हल्लेखोर) मारले गेले. यातील ११ महिला होत्या.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही हल्ल्यांमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे मान्य केले आहे.
रिपोर्टनुसार, हवा बलोच ही 'जेन झी' (Gen Z) पिढीतील तरुणी आहे. तिचे वडिलही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये होते. २०२१ मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या हल्ल्यात ते ठार झाले होते. तिने औपचारिक शिक्षण घेतल्याचेही समजते.
सुरुवातीला बलुच बंडखोरीत पुरुषांचे वर्चस्व होते. येथे आत्मघाती हल्ले दुर्मिळ मानले जात होते. मात्र, २०२२ पासून यात वेगाने बदल झाला आहे. पूर्वी महिला केवळ संदेशवहण, निधी संकलन किंवा आंदोलनांपुरत्या मर्यादित होत्या.
बलुचिस्तानच्या पितृसत्ताक समाजात महिलेने आत्मघाती हल्ला करणे हा पाकिस्तानसाठी मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
"सरकारी दडपशाही इतकी वाढली आहे की, महिलांनाही टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे," असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न बंडखोर गट करत आहेत.
एकेकाळी आत्मघाती हल्ल्यांचा विरोध करणारे गट आता महिलांना या आत्मघातकी मोहिमांमध्ये सामील करून घेत असून, ही बाब पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे.