पुढारी वृत्तसेवा
देशातील बहुतांश भागात होळी म्हणजे रंगांची उधळण, गुलाल आणि पिचकाऱ्यांचा आनंद असतो.
काशीच्या प्राचीन घाटांवर भक्त पिचकाऱ्या घेऊन नव्हे, तर चितेची पवित्र राख घेऊन एकत्र येतात, जीवनाचे अंतिम सत्य दर्शविणारी मसान होळी खेळली जाते.
'मसान होळी' किंवा 'भस्म होळी' प्रामुख्याने मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर खेळली जाते, जिथे अंत्यसंस्काराच्या चिता अहोरात्र जळत असतात.
पौराणिक कथेनुसार, शिवाच्या विवाह सोहळ्यात त्याचे स्मशानातील साथीदार सहभागी होऊ शकले नव्हते. म्हणूनच, देवाने भूत-गणांसोबत जळत्या चितांच्या राखेत 'हर हर महादेव'च्या गजरात होळी खेळली. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे.
शैव आगम परंपरेनुसार, अघोरी साधू आणि शिवभक्त ही होळी खेळतात. एकमेकांना भस्म लावून ते जन्म-मृत्यूच्या अतूट चक्राचे दर्शन घडवतात.
आता सोशल मीडियावर मसान होळीचे 'रील्स' मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव हा रिल्सपेक्षा खूपच वेगळा असतो.
काशीतील मणिकर्णिका घाटावरील मसान होळीचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने सहभागी होतात.
अलिकडे सोशल मीडियामुळे या उत्सवात खऱ्या साधूंपेक्षा कॅमेऱ्यासमोर 'पोज' देणारेच जास्त दिसतात.
यंदा सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि शास्त्रोक्त नियमांमुळे घाटावर थेट चितेच्या राखेशी खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. महाश्मशाननाथ मंदिर परिसरातच उत्सवावर मर्यादा आणल्या गेल्या होत्या.
मसान होळी हे केवळ मनोरंजन नाही, तर अहंकार, सौंदर्य, प्रतिष्ठा आणि महत्त्वाकांक्षा या सर्वांची शेवटी राखच होणार असल्याचा संदेश देते.
भस्माने होळी खेळणे म्हणजे क्षणभंगुरतेचा स्वीकार करणे होय. हा उत्सव विचित्र वाटू शकतो, पण तो तितकाच भव्य आहे.