पुढारी वृत्तसेवा
किडनी आणि यकृत हे दोन्ही अवयव शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करतात.
जेव्हा हे अवयव आधीच कमकुवत असतात (जुनाट आजार, मधुमेह किंवा वाढत्या वयामुळे) तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिरिक्त रसायनांचा भार टाकल्यास हे अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो.
सप्लिमेंट्स पूर्णपणे सुरक्षित असतात कारण ती 'नैसर्गिक' मानली जातात; परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, काही सप्लिमेंट्स तुमच्या किडनी किंवा यकृतावर अतिरिक्त ताण टाकू शकतात.
'CLD क्लीनिकल लिव्हर डिसीज' जर्नलनुसार, कपभर ग्रीन टी पिणे बहुतेक लोकांसाठी ठीक आहे, परंतु ग्रीन टी एक्स्ट्रॅक्टच्या गोळ्यांमध्ये कॅटेचिन विशेषतः एपिगॅलोकॅटेचिन गॅलेटचे प्रमाण खूप जास्त असते. ही संयुगे यकृताला सूज आणू शकतात आणि मोठ्या प्रमाणात घेतल्यास यकृताला गंभीर इजा पोहोचवू शकतात.
बॉडीबिल्डिंग आणि वजन वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडर तुमच्या किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतात. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त प्रथिने घेतल्यास, नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त कष्ट करावे लागतात.
चरबीत विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठवली जातात आणि ती विषारी पातळीपर्यंत पोहोचू शकतात. उदाहरणार्थ, व्हिटॅमिन 'ए' चे अतिप्रमाण यकृतावर ताण आणते . व्हिटॅमिन 'डी' आणि 'ई' देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास समस्या निर्माण करू शकतात.
शरीराला लोह आवश्यक आहे; परंतु शरीरातील पातळी जाणून न घेता लोह सप्लिमेंट्स घेतल्यास ते यकृतामध्ये साठू शकते. यकृत आणि इतर अवयवांना सूज येते आणि नुकसान होते.
अपचनासाठी ज्येष्ठमधाच्या सप्लिमेंट्सचा वापर केला जातो, परंतु त्यामध्ये 'ग्लायसिरायझिन' असते, जे रक्तदाब वाढवू शकते आणि पोटॅशियमची पातळी कमी करू शकते. हे परिणाम किडनी किंवा हृदयाचा त्रास असलेल्या लोकांसाठी विशेषतः धोकादायक असतात.
किडनीच्या आजारात, पोटॅशियम आणि फॉस्फरस धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतात. म्हणून वनस्पती-आधारित मल्टीविटामिन किंवा इलेक्ट्रोलाइट उत्पादने टाळली पाहिजेत.
'डिटॉक्स' किंवा 'फॅट-बर्नर' म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये अनेकदा उत्तेजक, लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे किंवा अज्ञात घटकांचे मिश्रण असते. हे हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट संतुलन, यकृत चयापचय आणि किडनीच्या फिल्टरेशन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.