पुढारी वृत्तसेवा
सध्या वजन कमी करण्यासाठी 'इंटरमिटंट फास्टिंग'ची (ठराविक काळ उपवास करण्याची पद्धत) मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
१६ तास उपवास आणि ८ तासांच्या कालावधीत जेवण.आठवड्यातील पाच दिवस सामान्य आहार आणि दोन दिवस फक्त ५००-६०० कॅलरीज घेणे, असे इंटरमिटंट फास्टिंगचे लोकप्रिय प्रकार आहेत.
'कोक्रेन डेटाबेस ऑफ सिस्टिमॅटिक रिव्ह्यूज'मध्ये १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे सांगताना अनेकदा अतिशयोक्ती केली जाते.
आता नवीन संशोधन इंटरमिटंट फास्टिंग हे वजन कमी करण्यासाठी इतर आहार पद्धतींपेक्षा जास्त प्रभावी नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, यामुळे सुरुवातीला वजन कमी होत असले तरी, त्याचे परिणाम अल्पकाळ टिकणारे असतात. कोणत्याही डाएट प्लॅनपेक्षा संतुलित आणि सकस आहार घेणेच अधिक महत्त्वाचे असल्याचे या संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे.
संशोधनासाठी उत्तर अमेरिका, युरोप, चीन आणि ऑस्ट्रेलियासह विविध देशांमधील सुमारे २,००० प्रौढांवर आधारित २२ क्लिनिकल चाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. यात असे आढळले की, नियमित आहार घेणाऱ्या आणि इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्यांच्या वजनात फारसा फरक पडलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते "इंटरमिटंट फास्टिंगचे नियम सोपे असल्याने लोक त्याकडे आकर्षित होतात, पण हे काही जादूई औषध नाही. औषधांशिवाय वजन कमी करण्याच्या कोणत्याही पद्धतीत ६ ते १२ महिन्यांनंतर पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते."
"तुम्ही काय आणि किती खाता, हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीचे पदार्थ खाणे सुरूच ठेवले, तर उपवास करूनही मर्यादित परिणाम मिळतील." असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात.
सोशल मीडियावरील 'हाईप'ला बळी न पडता तज्ज्ञांच्या सल्ल्याने जीवनशैलीत बदल करणे हाच वजन कमी करण्याचा शाश्वत मार्ग असल्याचे नवीन संशोधन सांगते.