पुढारी वृत्तसेवा
काय खावे, कोणाला टाळावे आणि समूहात कसे वागावे हे सारं हत्तींची पिल्लं आपल्या आई आणि मावश्यांच्या सावलीत शिकतात.
गेल्या काही वर्षांतील वाढत्या शिकारी आणि लोकसंख्या व्यवस्थापनाच्या चुकीच्या पद्धतींमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे की, ज्येष्ठ हत्तींच्या मार्गदर्शनाशिवाय वाढणारी पिढी अस्तित्वाच्या लढाईत मागे पडत आहे.
युनायटेड किंगडममधील 'युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाउथ' येथील वर्तणूक शास्त्रज्ञ (Behavioral Ecologist) लुसी बेट्स यांनी आफ्रिका आणि आशियातील हत्तींच्या ९५ शास्त्रीय अभ्यासांचे विश्लेषण केले.
लुसी बेट्स यांच्या मते, ज्येष्ठ हत्ती नसलेल्या कळपातील तरुण हत्तींचा जगण्याचा दर कमी असतो. हे हत्ती इतरांसोबत कमी वेळ घालवतात आणि संकटाच्या वेळी त्यांची प्रतिक्रिया चुकीची किंवा अपुरी असते.
ज्येष्ठ हत्तींच्या निधनासोबतच पिढ्यानपिढ्या चालत आलेले 'सांस्कृतिक ज्ञान' आणि अनुभवाची शिदोरीही नष्ट होते, असा इशारा बेट्स यांनी दिला आहे.
प्राणीशास्त्राच्या अभ्यासात स्पष्ट झाले की, हत्तींच्या पिल्लांना आपल्या मोठ्यांकडून अन्नाची निवड करण्याचे शिक्षण मिळते. इतकेच नाही, तर मादी हत्ती आपल्या मुलीला योग्य जोडीदार कसा निवडायचा, याचेही प्रात्यक्षिक करून दाखवते.
ज्या हत्तींच्या कळपाचे नेतृत्व ज्येष्ठ मादी करते, तिथे पिल्लांचा मृत्यूदर कमी असतो. तसेच दुष्काळासारख्या परिस्थितीत जगण्याची शक्यता जास्त असते.
हत्तींना माणसांशी कसे वागायचे, हेदेखील अनुभवातून शिकावे लागते. ज्या भागात हत्तींच्या शिकारी होतात, तिथल्या माणसांच्या कपड्यांचा वास येताच हत्ती लांब पळतात.
काही वेळा तरुण हत्ती शेतातील पिके खाणे किंवा कुंपण तोडणे यांसारख्या सवयी मोठ्या हत्तींकडून शिकतात, ज्यामुळे मानव-हत्ती संघर्ष वाढतो.
हत्तींच्या संवर्धनासाठी केवळ त्यांची संख्या वाढवणे पुरेसे नाही, तर त्यांच्यातील सामाजिक वीण टिकवणे गरजेचे आहे. शिकारी अनेकदा मोठ्या दातांसाठी ज्येष्ठ हत्तींना लक्ष्य करतात, पण त्यामुळे संपूर्ण पिढीचे ज्ञान नष्ट होते.
बदलत्या हवामानात आणि संपत चालेल्या जंगलात हत्तींना वाचवायचे असेल, तर त्यांच्यातील 'वडिलधाऱ्यांची' परंपरा टिकवून ठेवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे संशोधन सांगते.