अंजली राऊत
मखाना आलू चाट ही सोपी रेसिपी असून हलका नाश्ता म्हणून तुम्ही ही डिश संध्याकाळी करु शकतात किंवा मुलांना देखील जेवणाच्या डब्यात हेल्दी नाश्ता म्हणून देऊ शकतात
मखाना आलू चाट तुमच्यासाठी परिपूर्ण रेसिपी आहे. या चाटची खासियत म्हणजे ती हलकी पण पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. मखानामधील कॅल्शियम, प्रथिने आणि फायबरमुळे ती संध्याकाळचा निरोगी नाश्ता आहे.
मखाना बटाट्यांसोबत एकत्र केल्यावर ती स्वादिष्ट बनते. ही डिश मुलांना नेहमीच आवडेल. तर, या निरोगी, चविष्ट आणि कुरकुरीत चाटची सोपी रेसिपी अशी आहे
2 कप मखाना, 2 उकडलेले बटाटे, 1टीस्पून तूप किंवा तेल, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा किंवा हवे असल्यास 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 2 ते 3 टेबलस्पून दही, 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून भाजलेले जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर पाने आणि लिंबाचा रस
मखाना आलू चाट बनवण्यासाठी, प्रथम एका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा, त्यात मखाने घाला आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे तळा. मखाने कुरकुरीत झाले की, बाहेर काढून थंड होऊ द्या.
उकडलेले बटाट्याचे लहान तुकडे करा. हवे असल्यास, तुम्ही ते हलके भाजून घेऊ शकता किंवा पॅनमध्ये थोडे तूप घालून सोनेरी रंग देण्यासाठी तळून घेऊ शकतात. यामुळे चाटची चव वाढते.
त्यानंतर, एका मोठ्या भांड्यात भाजलेले मखाना,बारीक केलेले बटाटे, कांदा, टोमॅटो आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. आता दह्यात चाट मसाला, भाजलेले जिरे, तिखट आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा. शेवटी कोथींबीर आणि थोडा लिंबाचा रस घाला आणि सर्व्ह करा.