पुढारी वृत्तसेवा
नोट्स कीबोर्डवर टाईप करण्यापेक्षा हाताने लिहिणाऱ्यांच्या मेंदूची माहिती प्रक्रियेची पद्धत पूर्णपणे वेगळी असते, असा दावा मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.
'फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी'मध्ये २०२४ मध्ये प्रकाशित अभ्यासात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
नॉर्वेजियन युनिव्हर्सिटीचे संशोधक ऑड्रे मीर आणि रुड व्हील यांनी विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या हालचालींचा अभ्यास करून लिहिणे व टाईपिंगमधील फरक स्पष्ट केला.
संशोधनात २५६ सेन्सर्स असलेल्या उच्च-घनता EEG प्रणालीचा वापर झाला. टायपिंगच्या तुलनेत हाताने लिहिताना मेंदूच्या विविध भागांमध्ये अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले.
हाताने लिहिताना मेंदूला बोटांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे लागते, दृष्टी व स्पर्शाचा समतोल साधावा लागतो. याउलट टायपिंग करताना केवळ एकच की (Key) वारंवार दाबली जात असल्याने ही हालचाल एकसुरी ठरते.
हाताने लिहिताना मेंदूतील थिटा आणि अल्फा फ्रिक्वेन्सीचे नेटवर्क अधिक जोडले जाते, ज्याचा थेट संबंध नवीन माहिती ग्रहण करणे आणि ती दीर्घकाळ आठवणीत साठवून ठेवण्याशी असतो.
हाताने लिहिताना व्यक्ती संपूर्ण वाक्य जसेच्या तसे न लिहिता महत्त्वाची माहिती निवडते. यामुळे मेंदूला माहितीवर अधिक प्रक्रिया करावी लागते.
टायपिंग व्यावहारिकदृष्ट्या लांबलचक दस्तऐवज लिहिण्यासाठी उत्तमच आहे; परंतु केवळ डिजिटल उपकरणांमुळे हाताने लिहिण्याची सवय पूर्णपणे बंद होऊ नये.
हाताने अक्षरे काढल्याने मुलांना प्रत्येक अक्षराचा आकार ओळखण्याचा आणि स्वतः तयार करण्याचा सराव मिळतो, त्यांच्या मेंदूचा विकास आणि पायाभूत साक्षरता सुधारण्यास मोठी मदत होते.
डिजिटल स्क्रीनवर 'स्टायलस पेन'ने लिहितानाही पेन-कागदासारख्याच शारीरिक हालचाली होतात, त्यामुळे डिजिटल उपकरणांवरही हाताने लिहिण्याचा सराव टिकवून ठेवता येतो.
अलिकडे अभ्यासात स्क्रीनचा वापर वाढला असला, तरी कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यासाठी आजही वही-पेनचा वापर करणे तितकेच फायदेशीर असल्याचा संशोधन सांगते.