Giant Anteater २ फूट लांब जीभ, नळीसारखे लांब तोंड, दिवसा ३० हजार मुंग्या खाणारा प्राणी

Namdev Gharal

'जायंट अँटीटर' (Giant Anteater) हा प्राणी निसर्गातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्भूत प्राण्यांपैकी एक आहे. प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेत हा प्राणी आढळतो.

नावानुसारच हा अँटीटर प्रजातींमधील सर्वात मोठा प्राणी आहे. एका पूर्ण वाढलेल्या जायंट अँटीटरची लांबी साधारणपणे ६ ते ७ फूट पर्यंत असू शकते. त्याचे वजन ३० ते ५० किलो ग्रॅम दरम्यान असते.

या प्राण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची जीभ. याची जीभ तब्बल २ फूटापर्यंत लांब असू शकते. शरीराच्या प्रमाणात एवढी लांब जीभ असलेला हा दुर्मिळ प्राणी आहे. ही जीभ थेट त्याच्या छातीच्या हाडाला जोडलेली असते.

हा प्राणी एका दिवसात साधारणपणे ३०,००० ते ३५,००० मुंग्या आणि वाळवी खातो. मुंग्यांच्या वारुळात जीभ फिरवून तो एकाच वेळी शेकडो मुंग्या तोंडात ओढतो.

मुंग्या खाताना हा प्राणी अत्यंत वेगाने काम करतो. तो आपली लांब आणि चिकट जीभ एका मिनिटात तब्बल १५० वेळा वारुळात आत-बाहेर करू शकतो. यामुळे मुंग्यांना पळून जाण्याची संधीच मिळत नाही.

याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे जायंट अँटीटरला एकही दात नसतो. त्याचे तोंड नळीसारखे लांब आणि अरुंद असते. तो संपूर्ण अन्न न चावता थेट गिळतो. त्याच्या पोटाची रचना अतिशय कडक असते, जी मुंग्यांना तिथेच चिरडून टाकते.

त्याच्या जिभेवर एक विशेष प्रकारचे ग्रंथींमधून अतिशय चिकट लाळ पाझरत असते. जेव्हा तो जीभ वारुळात टाकतो, तेव्हा मुंग्या आणि वाळवी त्या चिकट लाळेला सहज चिकटतात आणि बाहेर येतात.

त्याच्या पुढच्या पायांना ४ इंचांपर्यंत लांब आणि धारदार नखे असतात. या नख्यांचा उपयोग तो मुंग्यांची आणि वाळवीची कडक वारुळे फोडण्यासाठी करतो. ही नखे इतकी मजबूत असतात की तो स्वसंरक्षणासाठी हिंस्र प्राण्यांवरही याने हल्ला करू शकतो.

हा प्राणी निसर्गाचा नियम पाळतो! तो कोणत्याही एका वारुळातील सर्व मुंग्या कधीच संपवत नाही. एका वारुळात तो जेमतेम २ मिनिटेच थांबतो आणि काही मुंग्या खाऊन पुढे निघून जातो. यामुळे मुंग्यांचे वारूळ पुन्हा तयार होते भविष्यात तिथे पुन्हा अन्न मिळते.

त्याच्या पुढच्या पायांची नखे खूप लांब आणि तीक्ष्ण असल्यामुळे तो आपले तळवे जमिनीवर टेकवून सरळ चालू शकत नाही. नखे सुरक्षित राहण्यासाठी आणि ती झिजून खराब होऊ नयेत म्हणून तो पायांच्या मुठी वळवून चालतो.

त्याची शेपटी खूप मोठी आणि केसाळ (झुपकेदार) असते. जेव्हा हा प्राणी झोपतो, तेव्हा तो आपली ही मोठी शेपटी संपूर्ण शरीरावर पांघरून घेतो.

येथे क्लिक करा