पुढारी वृत्तसेवा
नवीन संशोधनानुसार, काही प्रकारच्या त्रासांमध्ये व्यायाम हा नेहमीच्या पेनकिलर (पेन किलर गोळ्या) इतकाच किंवा त्याहून अधिक प्रभावी ठरू शकतो.
ॲडलेड युनिव्हर्सिटीने २ लाख २० हजारांपेक्षा जास्त लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, नियमित व्यायामाने जुने आणि तीव्र दुखणे लक्षणीयरीत्या कमी होते.
मायग्रेन असो, मासिक पाळीच्या वेदना असोत किंवा पाठ-कंबरदुखी; योगासन आणि ताई ची यांसारख्या हलक्या व्यायामांमुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
संशोधनात स्पष्ट झाले की, व्यायामामुळे नेहमीच्या वेदनाशामक औषधांपेक्षा वेदना कमी होण्याचे प्रमाण तब्बल ६० टक्क्यांनी वाढते.
हळूवार आणि कमी तीव्रतेचा व्यायाम जास्त फायदेशीर ठरतो. वेदना कमी करण्यासाठी खूप जास्त त्रास सहन करत कठीण व्यायाम करण्याची अजिबात गरज नाही.
आठवड्यातून एकूण १२० मिनिटांपेक्षा कमी वेळेचा सोपा व्यायाम हा जास्त वेळ केलेल्या कठीण व्यायामापेक्षा वेदना कमी करण्यात अधिक प्रभावी ठरतो.
व्यायाम करताना शरीरात 'एंडॉर्फिन' आणि 'सेरोटोनिन' ही रसायने तयार होतात. ही रसायने मेंदूची वेदना सहन करण्याची क्षमता वाढवतात आणि मूड सुधारतात.
डॉक्टर अजूनही औषधांसारखा ठराविक व्यायामाचा डोस (प्रकार आणि वेळ) रुग्णांना लिहून देत नाहीत; केवळ 'सक्रिय राहा' असा मोघम सल्ला दिला जातो, जो पुरेसा नाही.
तुमच्या दुखण्यानुसार योग्य व्यायामाची निवड केल्यास औषधांवरील अवलंबित्व नक्कीच कमी होऊ शकते, हेच नवीन संशोधन सांगते.