पुढारी वृत्तसेवा
सुस्ती घालवण्यासाठी आणि झटपट ताजेतवाने होण्यासाठी तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्स अन् स्टिम्युलंट सप्लिमेंट्स पिण्याचे प्रमाण वाढले आहे.
नवीन संशोधनानुसार, एनर्जी ड्रिंक्स पिणाऱ्या तरुणांमध्ये अचानक हृदयाचे ठोके थांबण्याचा (कार्डियाक अरेस्ट) धोका तब्बल ११ पटीने जास्त आढळला आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार, या पेयांमुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचा धोका ४.५ पटीने, तर हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा त्रास ४ पटीने वाढतो.
एनर्जी ड्रिंक्समध्ये सामान्य कॉफीपेक्षा तिप्पट जास्त कॅफिन असते. यामधील गुआरना आणि टॉरिनसारखे घटक शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स अन् रक्तदाब अचानक वाढवतात.
हृदयविकाराच्या गंभीर तक्रारींमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपैकी तब्बल ४५% रुग्ण हे १८ ते ३४ या वयोगटातील तरुण आहेत.
जिममध्ये कसरत करताना प्री-वर्कआउट म्हणून किंवा मद्यपानासोबत एनर्जी ड्रिंक्स एकत्र करून पिणे हृदयावर दुप्पट ताण आणते आणि अधिक धोकादायक ठरते.
छातीत तीव्र धडधड होणे, छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे आणि चक्कर येणे ही शरीरात उत्तेजक घटकांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्याची मुख्य लक्षणे आहेत.
अनेकदा तरुणांना आपल्याला हृदयाचा किरकोळ आजार असल्याचे माहित नसते. अशा वेळी अति-कॅफिनचे सेवन केल्यास अचानक गंभीर हृदयविकार उद्भवू शकतो.
दिवसाभरातील एकूण कॅफिनचे प्रमाण मोजा, खरेदी करताना बॉटलवरील लेबल वाचा, उच्च रक्तदाब किंवा धडधडीचा त्रास असल्यास ही पेये पूर्णपणे टाळा अन् डॉक्टरांचा सल्ला घ्या!