अंजली राऊत
शेवग्याच्या शेंगा म्हटल्या की, आठवण होते त्या मस्त झणझणीत रस्स्याची किंवा गावरान पद्धतीने केलेल्या भाज्यांची. साधी भाजी असली तरी जर मसाल्यात योग्य तो बदल केला, तर हीच साधी भाजी झकास तयार होते
शेवग्याच्या शेंगा, कांदा – 2 मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले), टोमॅटो –2 (बारीक चिरलेले), आले लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून, शेंगदाण्याची कूट – 3 टेबलस्पून, खोबरा किस –2 टेबलस्पून, लाल तिखट – 2 चमचे, हळद – अर्धा चमचा, धणे-जीरे पूड – 1 चमचा, गरम मसाला – 1 चमचा, चिंचेचा कोळ – 1 टेबलस्पून, मीठ – चवीनुसार, तेल – 3 टेबलस्पून आणि कोथिंबीर
शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन 2-3 इंचाचे तुकडे करा. त्यानंतर थोडे मीठ आणि हळद घालून या शेंगा पाण्यात आतील गर मऊसूत हाेईपर्यंत शिजवून घ्या, पण थोड्याशा टणकच राहू द्या.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आले लसूण पेस्ट टाका, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत चांगले शिजवून घ्या
यामध्ये लाल तिखट, हळद, धणे-जीरे पूड, गोडा मसाला किंवा गरम मसाला घालून छान परतून घ्या. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि खोबरा किस टाकून 2 मिनिटे भाजून घ्या. नंतर चिंचेचा कोळ घालून झणझणीत आंबटसर भाजीला चव द्या.
आता यामध्ये शिजवलेल्या शेंगा घालून हलक्या हाताने मिक्स करा. त्यानंतर थोडे पाणी टाकून आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजवा म्हणजे मसाला शेंगांमध्ये चांगला मुरतो.
वरून कोथिंबीर टाकून गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत गरमागरम खा
शेवग्याच्या शेंगा आधी थोड्या उकळून घेतल्याने भाजीला मस्त गोडसर चव येते. शेंगदाणा + खोबरा किस मसाला भाजीत टाकल्याने भाजीला गावरान आणि चमचमीत फ्लेवर येतो आणि चिंचेचा कोळ टाकल्याने आंबटसर चव अप्रतिम लागते.