पुढारी वृत्तसेवा
मुंबई म्हटलं की चाळ संस्कृती आठवते. पण चाळींची सुरुवात कशी झाली आणि 'चाळ' हा शब्द कुठून आला, माहिती आहे का?
'चाळ' हा शब्द पोर्तुगीज भाषेतील 'Chalet' (शॅले) या शब्दापासून आला आहे. शॅले म्हणजे लहान घर किंवा कॉटेज.
अनेक शॅले किंवा कॉटेज एकत्र जोडून बॅरक्स तयार करण्यात येत. मुंबईत हेच बांधकाम वाढत गेले आणि त्यातून 'चाळ' ही संकल्पना विकसित झाली.
'चाळ'च नाही तर तुरुंग, पगार, बटाटा, अननस, बेवडा असे अनेक शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले आहेत.
मुंबईतील सुरुवातीच्या चाळी क्रॉफर्ड मार्केट परिसरात उभ्या राहिल्या. त्यानंतर गिरगावात मोठ्या प्रमाणावर चाळ संस्कृती विकसित झाली.
गिरगावात प्रामुख्याने कार्यालयीन किंवा शिक्षित वर्ग राहत होता. तर गिरणगावात गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची मोठी वस्ती निर्माण झाली.
गिरगाव आणि गिरणगाव हे दोन्ही मुंबईचे भाग असले तरी त्यांची जीवनशैली, विचार आणि सांस्कृतिक परंपरा वेगळी विकसित झाली.
गिरणगावातील अनेक कुटुंबे चार-पाच पिढ्या मुंबईत राहिली, तरी आजही गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी म्हणजे कोकणात जातात.
गिरण्या, कारखाने आणि उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं. यामुळे शहराचा सामाजिक आणि सांस्कृतिक चेहरामोहराच बदलला.
चाळ म्हणजे मुंबईच्या इतिहासाचा, संघर्षाचा, एकोप्याचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा. आजही चाळ संस्कृती मुंबईच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग मानली जाते.