पुढारी वृत्तसेवा
इथलं पाणी सामान्य समुद्राच्या तुलनेत १० पट जास्त खारट आहे. या पाण्यात मासे किंवा अन्य जलचर प्राणी जिवंत राहू शकत नसल्यानेच याला 'मृत समुद्र' म्हणतात.
पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की तुम्ही या पाण्यात न पोहता आपोआप तरंगत राहता.
हा समुद्र जमिनीवरील समुद्रसपाटीपासून सर्वात खाली आहे. हा पृथ्वीवरील सर्वात सखल बिंदू मानला जातो (सुमारे ४३० मीटर खाली).
येथील पाण्यात, चिखलात मॅग्नेशियम, पोटॅशियम,कॅल्शियम सारखी महत्त्वाची खनिजे आहेत. येथील चिखल अंगाला लावल्याने त्वचा आजार बरे होतात असे मानले जाते.
इथे मासे राहू शकत नसले, तरी डोळ्यांना न दिसणारे अत्यंत छोटे बॅक्टेरिया आणि शेवाळ यांसारखे जीव या खारट पाण्यातही तग धरून राहतात.
जॉर्डन नदीचे पाणी वळवल्यामुळे आणि कारखान्यांसाठी खनिजे काढल्यामुळे दरवर्षी येथील पाण्याची पातळी १ मीटरने खाली जात आहे.
पाणी आटल्यामुळे जमिनीच्या खाली असलेले मिठाचे थर विरघळतात आणि अचानक मोठे खड्डे तयार होतात. त्यामुळे किनार्यावर फिरणे धोकादायक बनत चालले आहे.
हा समुद्र खोल भागात असल्यामुळे हवा दाट असते. ही हवा सूर्याची घातक अतिनील किरणे रोखते. इथे उन्हात जास्त वेळ राहूनही त्वचा भाजण्याचा धोका कमी असतो.
येथील पाण्यात तरंगणे जरी सोपे असले, तरी पोहणे धोकादायक ठरू शकते. खारट पाणी डोळ्यात किंवा तोंडात गेले, तर खूप आग होते.