World Thyroid Day 2026 | थायरॉईड आजार का होतो? 'ही' मुख्य कारणे नक्की जाणून घ्या!

पुढारी वृत्तसेवा

थायरॉईड आजाराबद्दल जागरूकता वाढावी या उद्देशाने दरवर्षी २५ मे रोजी 'जागतिक थायरॉईड दिन' साजरा केला जातो.

थायरॉईड ही मानेच्या समोरील भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची एक लहान ग्रंथी (Gland) असते. ही ग्रंथी शरीराला आवश्यक अशी हार्मोन्स तयार करते.

ही ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नाही, तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

हायपोथायरॉईडीझम : यामध्ये शरीरात काही महत्त्वाच्या हार्मोन्सची निर्मिती कमी होते. ज्यामुळे वजन वाढणे, थकवा, केस गळणे आणि सुस्ती येणे अशा समस्या उद्भवतात.

हायपरथायरॉईडीझम : यामध्ये हेच हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त तयार होऊ लागतात. वजन कमी होणे, घाबरल्यासारखे वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे असा त्रास होऊ शकतो.

'क्लीव्हलँड क्लिनिक'च्या रिपोर्टनुसार, थायरॉईडमागे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील समस्या, ऑटोइम्यून डिसऑर्डरसह काही पोषक तत्वांची कमतरता असते.

थायरॉईडच्या आजाराचे सर्वात मोठे कारण ऑटोइम्यून डिसऑर्डर मानले जाते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करू लागते. यामुळे हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम होतो.

शरीरात आयोडीनची कमी असणे हे देखील थायरॉईडचे एक मोठे कारण आहे. आहारात आयोडीनची कमतरता असेल तर हा धोका अधिक वाढतो.

महिलांमध्ये गर्भधारणा, मासिक पाळी आणि मेनोपॉज (रजोनिवृत्ती) दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे थायरॉईडचा धोका वाढतो.

कुटुंबात आधी कोणाला थायरॉईडचा त्रास असेल, तर अनुवांशिक कारणांमुळे इतर सदस्यांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

थायरॉईड झाला असेल, तर नियमित उपचार आणि जीवनशैलीत बदल करून यातील धोके कमी केले जाऊ शकतात.

थायरॉईडच्या समस्येमध्ये आयोडीन, सेलेनियम, झिंक आणि आर्यन यांसारखी पोषक तत्वे फायदेशीर मानली जातात.

दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि ताणतणाव कमी होतो.

वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने 'थायरॉईड प्रोफाईल टेस्ट' करत राहा, जेणेकरून शरीरातील थायरॉईडच्या पातळीचा अचूक अंदाज येऊ शकेल.

येथे क्‍लिक करा.