पुढारी वृत्तसेवा
नैसर्गिक विविधतेने नटलेले ओरिसा राज्यातील चिलिका सरोवर हे आशिया खंडातील सर्वात मोठे, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
आपल्या अद्वितीय परिसंस्थेमुळे आणि जैवविविधतेमुळे या सरोवराने जागतिक नकाशावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बंगालच्या उपसागराला जोडले गेलेले हे सरोवर दया नदीच्या मुखाशी असून ओरिसातील पुरी, खुर्दा आणि गंजाम या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
हे सरोवर केवळ माशांच्या विविध प्रजातींचे माहेरघर नसून, दुर्मिळ अशा डॉल्फिनचे देखील निवासस्थान आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत चिलिका सरोवराला 'पक्ष्यांचे नंदनवन' मानले जाते. सायबेरियासारख्या अतिदूरच्या प्रदेशातून लाखो स्थलांतरित पक्षी येथे वास्तव्यास येतात.
पक्ष्यांच्या या मोठ्या संख्येमुळेच हे ठिकाण आशियातील स्थलांतरित पक्ष्यांचे सर्वात मोठे हिवाळी केंद्र बनले आहे.
चिलिका सरोवराचे पर्यावरणीय महत्त्व ओळखून, 'रॅमसर कन्व्हेन्शन' (Ramsar Convention) अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या यादीत स्थान मिळवणारे हे भारतातील पहिले स्थळ ठरले होते.
चिलिका हे सरोवर पर्यटनाचे मोठे केंद्र बनले असून, येथील शांत नौकाविहार आणि पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.