पुढारी वृत्तसेवा
आधुनिक वैद्यकशास्त्रात जिवाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी 'प्रतिजैविके' (अँटीबायोटिक्स) हे एक प्रभावी शस्त्र मानले जाते.
सध्या अँटीबायोटिक्स होणारा गैरवापर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्याचे प्रमाण वाढल्याने 'अँटीबायोटिक रेझिस्टन्स' (प्रतिजैविकांना दाद न देणे) हे एक मोठे जागतिक आरोग्य संकट उभे राहिले आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी या औषधांचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा जबाबदारीने वापर करणे आता काळाची गरज बनली आहे.
प्रतिजैविकांचा अनावश्यक किंवा चुकीचा वापर केल्यास जिवाणू स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. यामुळे औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि संसर्ग अधिक गंभीर होतो.
जागतिक स्तरावर नवीन प्रतिजैविकांच्या संशोधनाचा वेग मंदावला आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध औषधे निकामी ठरल्यास मोठे संकट ओढवू शकते.
संसर्ग बरा न झाल्यामुळे रुग्णालयातील मुक्काम वाढतो, उपचारांचा खर्च वाढतो आणि मृत्यूचा धोकाही बळावतो.
सर्दी, खोकला किंवा तापासारख्या विषाणूजन्य आजारांवर प्रतिजैविके काम करत नाहीत. केवळ जिवाणू संसर्ग खात्रीशीर असल्यास औषध देणे आवश्यक आहे.
औषधाचा योग्य डोस आणि तो पूर्ण कालावधीसाठी घेणे गरजेचे आहे. अर्धवट उपचार सोडल्यास उरलेले जिवाणू अधिक शक्तिशाली होऊन प्रतिकारशक्ती निर्माण करतात.
घरात उरलेली जुनी प्रतिजैविके स्वतःच्या मनाने घेऊ नका.डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करा, लक्षणे कमी झाली तरी औषधे मध्येच सोडू नका.