पुढारी वृत्तसेवा
निरक्षर असूनही मराठी साहित्यविश्वात उभारला अभेद्य किल्ला.
अण्णाभाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी साहित्यिक, लोकशाहीर आणि समाजप्रबोधन करणारे लेखक होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते.
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. ते मातंग समाजातील होते. त्यांचे वडील भाऊ सिधोजी साठे, तर आई वालुबाई होत्या.
अण्णाभाऊंना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. मात्र, त्यांनी स्वतःच्या जिद्दीने अक्षरओळख करून घेतली आणि पुढे साहित्यविश्वात मोठं नाव कमावलं.
१९३२ मध्ये ते मुंबईत आले. कोळसे वेचणे, गाठोडी वाहणे, गिरणीत झाडूवाला अशी अनेक कामे त्यांनी केली.
मुंबईतील कामगारांचे हाल पाहून ते सामाजिक चळवळीत सहभागी झाले. १९३६ मध्ये कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी जोडले गेले.
त्यांनी तब्बल ३७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २ नाटके, १३ लोकनाट्य, २ शाहिरी वाङ्मय आणि १ प्रवासवर्णन असे विपुल साहित्य निर्माण केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कथा आणि कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झाले. त्यांच्या लेखनाने मराठी साहित्याबरोबरच चित्रपटसृष्टीवरही मोठा प्रभाव टाकला.
त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधन प्रबंध लिहिले गेले. बाबूराव गुरव आणि माधव गादे यांनी त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. संशोधन केले आहे.
औपचारिक शिक्षण नसतानाही अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला अमूल्य ठेवा दिला. त्यांचे साहित्य आजही सामाजिक परिवर्तन आणि प्रेरणेचा दीपस्तंभ मानले जाते.