पुढारी वृत्तसेवा
निसर्गात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्राणी विविध क्लृप्त्या लढवत असतात. मात्र, केवळ नखे, दात किंवा वेगाचाच नव्हे, तर 'उष्णतेचा' (Heat) देखील एक प्रभावी संरक्षण यंत्रणा म्हणून वापर केला जातो, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.
शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करणे किंवा सामूहिक ऊर्जेचा वापर करून शत्रूला जेरीस आणण्याचे तंत्र अनेक प्राण्यांमध्ये दिसून येते.
प्राणी प्रामुख्याने तीन प्रकारे उष्णतेचा वापर करतात: घातक उष्णता निर्माण करणे, उष्णतेचा वापर करून शत्रूला चकवा देणे किंवा शरीराच्या उच्च तापमानाचा वापर करून रोगांपासून संरक्षण करणे.
बोंबार्डियर बीटल (Bombardier Beetles) या किड्याला धोका जाणवतो, तेव्हा तो आपल्या पोटावाटे अत्यंत उष्ण आणि विषारी रसायनांचा फवारा शत्रूवर सोडतो. यामुळे शिकारी प्राणी दूर पळून जातात.
एखाद्या हॉर्नेटने (मोठी गांधीलमाशी) जपानी मधमाश्या (Japanese Honeybees)च्या पोळ्यावर हल्ला केला, तर सर्व मधमाश्या त्याच्याभोवती गोळा होतात. आपल्या शरीराची वेगाने हालचाल करून प्रचंड उष्णता निर्माण करतात. या उष्णतेने त्या आक्रमक हॉर्नेटला जिवंत 'शिजवून' मारतात.
कॅलिफोर्निया ग्राउंड स्क्विरल (California Ground Squirrel): ही खार आपली शेपटी गरम करते. उष्णता शोधणाऱ्या सापांना ती आकाराने मोठी असल्याचे भासते. या 'हीट सिग्नल'मुळे साप गोंधळून जातो.
उष्ण रक्ताचे प्राणी त्यांच्या शरीरातील नैसर्गिक उच्च तापमानाचा वापर बुरशी (Fungi) आणि घातक रोगजंतूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी करतात.
सापांसारखे प्राणी उष्णता ओळखणाऱ्या अवयवांद्वारे (Pit Organs) आपली शिकार शोधतात. मात्र, अनेक वेळा भक्ष्य याच उष्णतेचा वापर करून सापांची दिशाभूल करतात, असेही संशोधनात समोर आले आहे.