Namdev Gharal
सध्या पावसाळा सुरु आहे पाणी पडणाऱ्या ठिकाणी, भिंतीवर, फरशीवर, पाण्याच्या टाकीत पायऱ्यांवर शेवाळ येते, पाय घसरुन दुखापत होण्याची शक्यता खूप असते
हे शेवाळं घालवण्यासाठी व ते पुन्हा येऊ नये यासाठी काही घरगुती व रासायनिक उपाय पाहू
उकळते पाणी आणि जाडे मीठ: शेवाळलेल्या जागेवर प्रथम अगदी कडक उकळते पाणी टाका. त्यानंतर त्यावर जाडे मीठ (खडे मीठ) पसरा. ५-१० मिनिटांनी ब्रशने घासून धुवून टाका.
व्हाइट व्हिनेगर : व्हिनेगरमधील ॲसिड शेवाळ मुळापासून नष्ट करते. स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर भरून शेवाळलेल्या जागेवर फवारा. १ ते २ तास तसंच राहू द्या, नंतर ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.
बेकिंग सोडा : शेवाळे असलेल्या भागावर बेकिंग सोडा भुरभुरा. त्यावर थोडं पाणी फवारून पेस्ट तयार होऊ द्या. अर्ध्या तासानंतर स्क्रबर किंवा ब्रशने घासून काढा.
ब्लिचिंग पावडर : पाण्यात ब्लिचिंग पावडर मिसळून त्याची पेस्ट तयार करा किंवा पावडर थेट ओलसर शेवाळावर टाका. २० मिनिटांनी घासून धुवून टाका. यामुळे शेवाळ निघून तेथील जंतूही मरतात.
पाण्याची टाकी किंवा हौदातील पाणी रिकामे करून भिंतींवर चुन्याची पेस्ट लावा किंवा चुना पाण्यात मिसळून १ दिवस राहू द्या. चुना शेवाळाची वाढ पूर्णपणे थांबवतो.
पाण्याच्या टाकीत शेवाळे साचत असेल, तर एका कापडात किंवा पोत्यात फिरकटीचा खडा बांधून टाकीच्या पाण्यात सोडावा. यामुळे पाणी स्वच्छ राहते आणि शेवाळे धरत नाही.
पाणी साचू देऊ नका: फरशी किंवा कुंडीच्या भोवती सतत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी साचल्यावरच शेवाळाची वाढ जास्त प्रमाणात होत असते