पुढारी वृत्तसेवा
रात्री दारु पिल्यानंतर सकाळचा हँगओव्हर वाढत्या वयानुसार शरीराची यंत्रणा बिघडल्याचा गंभीर इशारा असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
वय वाढते, तशी शरीराची चयापचय शक्ती (Metabolism) मंदावते. त्यामुळे अल्कोहोल पचवण्यासाठी शरीराला प्रचंड संघर्ष करावा लागतो.
युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनच्या संशोधनानुसार, वाढत्या वयात रक्तातील नशा दीर्घकाळ टिकून राहते आणि हँगओव्हर भयंकर होतो.
वयाच्या ३० नंतर दर १० वर्षांनी स्नायूंचे प्रमाण ८ टक्क्यांनी घटते आणि चरबी वाढते. हा बदल शरीराची मद्य सहन करण्याची क्षमता थेट संपवून टाकतो.
ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या मते, स्नायूंमध्ये पाणी जास्त असते. वय वाढल्याने स्नायू घटतात आणि पाणीही कमी होते, ज्यामुळे दारू शरीरात हवी तशी डायल्यूट (Dilute) होत नाही.
महिलांसाठी धोक्याची घंटा: महिलांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या स्नायूंचे प्रमाण कमी असल्याने, पुरुषांच्या तुलनेत त्यांना मद्याची नशा लवकर आणि अधिक तीव्रतेने चढते.
दारू पचवताना शरीरात 'ॲसेटाल्डिहाइड' नावाचा विषारी घटक तयार होतो. वय वाढेल तसे हा विषारी कचरा वेगाने बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते.
वाढत्या वयात तहान लागण्याची जाणीव कमी होते. त्यात मद्यपानामुळे शरीरातील उरलेसुरले पाणीही संपून जाते, ज्यामुळे तीव्र डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो.
अल्प प्रमाणात मद्यपान आरोग्यासाठी धोकादायक मानले गेले आहे. याचे भान चाळीसीनंतर ठेवणे हिताचे ठरते.