पुढारी वृत्तसेवा
विकेंडची पार्टी असो किंवा ऑफिसनंतर कधी तरी मद्यपानाच्या सवय अनेक जण आपल्या जीवन शैलीचा भाग बनवतात.
कधी तरी मद्यपानाच्या केले तर आपल्याला कोणताही धोका नाही असा त्याचा समज असतो. मात्र, नवीन संशोधनाने एक धोक्याची घंटा वाजवली आहे.
केवळ काही तासांचे 'बिंज ड्रिंकिंग' (अति मद्यपान) सुद्धा तुमच्या आतड्यांच्या रचनेत गंभीर बदल घडवून आणू शकते, असे या संशोधनातून समोर आले आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, मद्यपान केल्यानंतर अवघ्या तीन तासांत लहान आतड्यातील आंत्र रसांकुर( villi) नावाच्या सूक्ष्म घटकांचा आकार आकुंचन पावतो.
'व्हिली' हे हाताच्या बोटांसारखे दिसणारे घटक असून ते अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम करतात. संशोधकांना असे आढळले की, मद्यपानामुळे या व्हिलीची लांबी कमी होते. शरीरात दाह वाढवणार्या पेशी सक्रिय होतात.
शास्त्रज्ञांनी यापूर्वी नियमित मद्यपान करणाऱ्यांमध्ये 'लीकी गट' नावाची स्थिती यापूर्वीच शोधली होती. यामध्ये आतड्यांचे संरक्षक आवरण कमकुवत होऊन जीवाणू आणि विषारी घटक रक्ताभिसरणात मिसळू लागतात.
ताज्या संशोधनानुसार, हा धोका केवळ दीर्घकाळ दारु पिणार्यांना नाही, तर अधूनमधून अति मद्यपान करणाऱ्यांनाही तितकाच आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना येथील संशोधक लॉरा रुप्रेक्ट यांच्या मते, आतड्यांमध्ये निर्माण झालेली ही दाहकता शरीराच्या इतर भागांत, विशेषतः मेंदूमध्ये पसरू शकते. यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि व्यक्तीला पुन्हा पुन्हा मद्यपान करण्याची इच्छा होऊ शकते.
आतड्याचा थर हा शरीराच्या 'त्वचे'सारखा असतो. अल्कोहोलसारखे जहाल पदार्थ या थराच्या थेट संपर्कात आल्यावर शरीराच्या आतील भागाला इजा पोहोचते.
आतड्यांचे रक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मद्यपानावर नियंत्रण ठेवणे. तज्ज्ञांच्या मते, पूर्णपणे मद्यपान टाळणे सर्वोत्तम आहे.