पुढारी वृत्तसेवा
दिवसभर आपला मेंदू सतत कार्यरत असतो. नवीन विचार, माहिती आणि अनुभव यांची प्रक्रिया मेंदूत सुरू असते, ज्यामुळे मज्जापेशींमधील (Synapses) संबंध दृढ होतात.
ताज्या संशोधनानुसार, दुपारी घेतलेली एक छोटी डुलकी मेंदूला पुन्हा टवटवीत करण्यासाठी आणि शिकण्याची क्षमता सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते.
'न्यूरोइमेज' (NeuroImage) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, दुपारची डुलकी केवळ थकवा दूर करत नाही, तर मेंदूच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणते.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा विद्यापीठातील संशोधकांमते, दिवसभराच्या कामाने मेंदूवर येणारा ताण झोपेमुळे दूर होऊन तो पुन्हा 'रिसेट' होतो. यामुळे मेंदूला नवीन माहिती साठवण्यासाठी पुरेशी जागा आणि ऊर्जा मिळते.
या अभ्यासात सहभागी झालेल्यांनी दुपारी सुमारे ४५ मिनिटांची डुलकी घेतली. त्यांच्या मेंदूमध्ये नवीन माहिती ग्रहण करण्याची क्षमता, जागृत राहिलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले.
स्पेनमध्ये ३,२०० प्रौढांवर करण्यात आलेल्या एका स्वतंत्र संशोधनानुसार, ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ डुलकी घेणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका २१ टक्क्यांनी कमी असतो.
याव्यतिरिक्त, दुपारी काही मिनिटांची विश्रांती घेतल्यामुळे स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रता वाढणे, नवीन कल्पना सुचणे आणि मानसिक ताण कमी होणे असेही फायदे होतात.
दुपारची डुलकी फायदेशीर असली तरी, तिची वेळ मर्यादित असणे आवश्यक आहे. संशोधनानुसार, दुपारची डुलकी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
दुपारची जास्त झोप रात्रीच्या नैसर्गिक झोपेत व्यत्यय आणू शकते. "दुपारची डुलकी रात्रीच्या किमान ७ तासांच्या झोपेचा पर्याय ठरू शकत नाही," असेही संशोधन स्पष्ट करते.