पुढारी वृत्तसेवा
भारतात सर्वत्र आढळणारा मुळा सर्वांच्या परिचयाचा आहे. यात पांढरा, लहान, लाल आणि गोल असे विविध प्रकार असतात.
महर्षी चरक यांनी मुळ्याला जरी 'अधम कंद' म्हटले असले, तरी अपचन, मूळव्याध, श्वासविकार आणि मुतखड्यावर तो अत्यंत गुणकारी मानला आहे.
जेवणात कच्चा मुळा किंवा कोशिंबीर खाल्ल्याने तोंडाची रुची वाढते. थंडीच्या दिवसांत परोठा किंवा भाकरीसोबत मुळा खाल्ल्यास पचनशक्ती प्रदीप्त होते.
मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांच्या रसात अधिक गुण असतात. पानांचा रस प्यायल्याने लघवी साफ होते. पानांची तुपात भाजी करून खाल्ल्यास उत्तम पोषण मिळते.
मूळव्याध असलेल्या रुग्णांसाठी मुळ्याची पाने किंवा त्याच्या खालील हिरव्या भागाचा रस तुपासोबत घेणे अत्यंत फायदेशीर ठरते.
लहान कोवळा मुळा तिखट, पाचक, त्रिदोषहारक आणि आवाज मधुर बनवणारा असतो. तो ताप, श्वास, नाक, गळा व डोळ्यांचे विकार दूर करण्यास मदत करतो.
मुळ्याच्या पानाच्या रसात सुराखार घालून प्यायल्याने किंवा मुळ्याच्या बियांचा काढा करून प्यायल्याने मुतखडा विरघळून नष्ट होण्यास मदत होते.
सुकलेल्या मुळ्याचा उकाळा (काढा) दर तासाने प्यायल्यास उचकी बंद होते. तसेच मुळ्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पोटातील गॅस व दुखणे दूर होते.
कोवळ्या मुळ्यात किंवा पानांच्या रसात साखर घालून प्यायल्याने अम्लपित्त (Acidity) दूर होते. मुळा आणि तीळ एकत्र खाल्ल्यास शरीरावरील सूज लवकर उतरते.
युनानीनुसार, मुळा उष्ण गुणधर्माचा असून जड भोजनाचे पचन करतो. मुळा जीर्ण खोकला, कफ बाहेर काढण्यासाठी हितावह आहे.
शास्त्रीय मतानुसार, मुळ्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन 'ए' व 'सी' भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.