पुढारी वृत्तसेवा
पिंपळगाव रेणुकाई ( जि. जालना), पुढारी वृतसेवा : भोकरदन तालुक्यात अवघडराव सावंगी येथे वास्तव्यास असलेल्या ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते (४१) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महाराज शनिवारी रात्री कीर्तन करून मठात परतले होते. त्यांचा मोबाईल गायब झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
सातपुते महाराज (मूळ रा. मुसळगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे मागील १३ ते १४ वर्षांपासून भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते. या ठिकाणाहून ते धार्मिक कीर्तन आणि समाजप्रबोधनाचे कार्य करीत होते. गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, आई-वडिलांची सेवा करावी, तसेच राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे, असा मोलाचा संदेश ते देत असत. त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांची ओळख निर्माण झाली होती.
काल शनिवारी रोजी रात्री सुमारे १० वाजेपर्यंत त्यांचे कीर्तन झाले. कीर्तन संपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे आपल्या मठात परतले आणि खोलीत झोपले. मात्र, रविवारी सकाळी बराच वेळ होऊनही महाराज बाहेर न आल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या गावकऱ्यांना संशय आला. गावकऱ्यांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर त्यांच्या राहत्या खोलीत पाहणी केली असता भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले