लंडन : लग्न हा माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण! अलीकडच्या काळात लग्नामध्ये मौजमस्तीचे प्रमाण वाढले आहे.अनेकदा वधू-वरांमधील गमती-जमतींचे व्हिडीओ चर्चेचे केंद्र बनतात. अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही आठवडे आधी एक वधू ब्युटीपार्लरमध्ये गेली. तिथे तिने हेवी मेकअप केला. त्याचे बिल चाळीस हजारांहून अधिक झाले. मात्र, ती ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच गुपचूप पसार झाली.
वधू मंडपातून पसार झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, सदर तरुणी ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच पसार झाली. ही घटना ब्रिटनमधील यॉर्क शहरात घडली आहे. एका महिलेचा विवाह होणार होता. तिने मेकअप करण्याचा निर्णय खूप आधी घेतला होता. ती तिच्या एका बहिणीसोबत ब्युटीपार्लरमध्ये पोहोचली. तिथे तिने मेकअप करवून घेतला.
मेकअपचे बिल 40 हजार रुपये झाले. 40 हजारांचा मेकअप करून घेतल्यावर ती बसून राहिली आणि संधी साधून तेथून पळून गेली. ब्युटी पार्लर चालवणार्यांना जेव्हा याबाबत समजले, तेव्हा त्यांनी तिला संपूर्ण पार्लरभर शोधले, मात्र ती दिसली नाही. त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता ती मेकअपसह पैसे न देताच पसार झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तरुणीला पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले.