मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका २९ वर्षांच्या अभिनेत्याचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अपहरणकर्त्यांकडून सुटका होताच या अभिनेत्याने ओशिवरा पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर अपहरणकर्त्यांविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्यांचा पुढील तपास घाटकोपर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या आदेशावरुन या गुन्ह्यांचा घाटकोपर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करीत आहेत. पोर्ट ब्लेअरचा मूळचा रहिवाशी असलेला अनुशील अनुप चक्रवर्ती हा चित्रपट अभिनेता असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरीतील ओशिवरा पार्क, रविकिरण अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने स्वतच्या करिअरची सुरुवात झी कंपनीच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे केली होती. त्यानंतर त्याने गेम ऑफ स्टुपिड लव्हर या चित्रपटाद्वारे प्रदार्पण केले.
दोन दिवसांपूर्वी तो घाटकोपर येथून विक्रोळीतील इस्टर्न एक्सप्रेसवरुन त्याच्या कारमधून जात होता. काही अंतर गेल्यानंतर त्याच्या कारला एका दुसऱ्या वाहनाने ओव्हरटेक केले. या वाहनातून उतरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्याच कारमधून त्याचे अपहरण केले होते. त्याला एका निर्जनस्थळी आणून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्याच्या आईला कॉल करुन अपहरणकर्त्यांनी अनुशीलचे अपहरण झाल्याची माहिती दिली. त्याच्या सुटकेसाठी वीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाही तर अनुशीलला सोडणार नाही, अशी धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली होती.