Latest

हॉट स्प्रिंग : चीनवर विश्‍वास कसा ठेवायचा?

Arun Patil

हॉट स्प्रिंग भागातून मागे हटल्याची एकतर्फी घोषणा चीनने केली. परंतु, चीनने कधीही प्रामाणिकपणा दाखवलेला नाही. अक्साई चीन हा आपला 38 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा भूभाग चीनने व्यापलेला आहे आणि इतरत्रही अनेक ठिकाणी चीन दावे करत आहे. हॉट स्प्रिंग ही अगदी छोटीशी समस्या आहे. आपण यामुळे फारसे समाधानी होण्यात अर्थ नाही. भारताच्या मुत्सद्देगिरीच्या परीक्षेची हीच वेळ आहे.

चीनने हॉट स्प्रिंग भाग खाली केल्याची एकतर्फी घोषणा समोर आली आहे. अलीकडेच भारत आणि चीनच्या कॉर्प्स कमांडरमध्ये चर्चेच्या 15 फेर्‍या झाल्या आणि रशियानेही चीनला भारतासोबत सलोखा कायम ठेवण्यास सांगितले आहे. कदाचित त्यामुळेच चीनने हॉट स्प्रिंग भागातून माघार घेतल्याचे विधान केले असेल; परंतु हे चित्र जोपर्यंत वास्तवात स्पष्टपणे दिसत नाही, तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे.

चीनच्या दाव्याची पाहणी उपग्रहाद्वारे किंवा प्रत्यक्षरीत्याही करायला हवी. दोन्हीकडे 60-60 हजार सैन्य तैनात असते, त्याच वेळी तुम्ही चर्चेच्या 15 फेर्‍या करता आणि त्यापुढेही करतच राहणार असता, हाच यातील गंमतीचा भाग आहे. तैनाती आणि तणावाच्या काळात चर्चेचे औचित्य काय, असा प्रश्‍न सहज उपस्थित होऊ शकतो. परंतु, त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की, हॉट स्प्रिंगच्या डावीकडे डेपसांगचा भाग भारतासाठी अधिक महत्त्वाचा आहे आणि तीच रेषा काराकोरमपर्यंत जाते.

नियंत्रण रेषेवर दोर्‍या, तारा किंवा खांब नाहीत. अशा स्थितीत दोन्ही देशांचे आपापले दावे आहेत आणि त्याबाबतचे वाद अनेक वर्षांपासून सुरू आहेत. 1959 मध्ये चीनने एक रेषा तयार करून दिली; परंतु ती भारताने मान्य केलेली नाही. पूर्वी जी रेषा होती, ती तशीच असायला हवी, असे आपण म्हणतो. सध्या सुरू असलेल्या चर्चेत चीन भारताची मागणी अवास्तव असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे चीनने नुकतीच माघार घेतल्याबाबत जे सांगितले, त्यावर कसा विश्‍वास ठेवता येईल?

आपल्यासाठी हॉट स्प्रिंगच्या वरील क्षेत्र व्यूहात्मकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या विशेष लष्करी तुकड्यांनी डोंगराळ भागात दबाव निर्माण केला होता, तेव्हा चीन काही प्रमाणात मागे हटला होता; परंतु काही ठिकाणी माघार घेतल्याने फायदा होणार नाही. चीनने संपूर्ण परिसर रिकामा करायला हवा. हॉट स्प्रिंगचा वाद जुना असला, तरी हा परिसर अनेकदा चर्चेत आला आहे. 1959 मध्ये निर्माणाधीन हॉट स्प्रिंग पोस्टवरून एक टेहळणी पथक बेपत्ता झाले होते.

बेपत्ता पोलिसांचा शोध घेणा़र्‍यांना चिनी सैन्याच्या शत्रुत्वाला सामोरे जावे लागले. गोळीबारात सीआरपीएफचे नऊ जवान शहीद झाले. एका जवानाचा नंतर मृत्यू झाला. तो दिवस होता 21 ऑक्टोबर. हा दिवस आता संपूर्ण भारतात पोलिस शहीद दिन किंवा पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. या घटनेनंतर पोलिस-निमलष्करी दल हटवून चीन सीमेवर लष्कर तैनात केले होतेे. चीनने आता हॉट स्प्रिंग परिसर सोडला किंवा माघार घेतली असेल, तर चीनने एकप्रकारे त्यांची चूकच सुधारली आहे.

1959 पासून चिनी सैनिक हळूहळू आपल्या सीमेत घुसत आहेत. नेपाळच्या उत्तरेकडील दोन-चार गावांवर चीनने ताबा मिळविला आहे.
आता हॉट स्प्रिंग भाग सोडण्याविषयी बोलून आपण शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भर देत आहोत, हे चीन दाखवू इच्छित असेल; परंतु एवढ्याने आपण समाधानी न राहता सर्व बाबींची तयारी ठेवावी. चीन आपल्या किंवा तैवानच्या सरहद्दीत आणखी कुठेही घुसखोरी करू शकतो. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यापासून चीनही चर्चेत आहे.

चीनची साम्राज्यवादी धोरणे कोणापासूनच लपलेली नाहीत. चीनने दुःसाहस केले, तर कोणताही त्रयस्थ देश सहजासहजी आपल्या बाजूने येणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 'नाटो' देश युक्रेनच्या पाठीशी होते. रशियाने हल्ला केल्यावर मात्र कोणताही देश रशियाच्या विरोधात उघडपणे समोर आला नाही. जगाची परिस्थिती समजून घेऊन तयारी केली पाहिजे. संरक्षण सामग्रीच्या पुरवठ्यासाठी आपण रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत. परंतु, आपल्या अडचणीच्या वेळी रशिया फारसा पुढे येणार नाही.

रशियासोबतचे काही संरक्षण करार आता अडकून पडतील, असे दिसते. आपल्या लष्कराची 63 टक्के शस्त्रे आणि उपकरणे रशियाकडून येतात. म्हणूनच भारताने सतर्क राहणे आणि तयारी करणे आवश्यक आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्थापना जेव्हा झाली, तेव्हा असे मानले जात होते की, ही संस्था सर्व देशांमधील वाद मिटवेल, जागतिक शांततेसाठी प्रयत्न करेल आणि त्यामुळे जगात युद्धे टळतील.

वास्तव असे दिसून येईल की, अशा सर्व संस्था आज मूक प्रेक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि युद्ध मात्र सुरूच आहे. 'ज्याच्या हाती ससा तो पारधी,' असे रशियाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. रशियाला मदतीची गरज भासताच त्याने चीनची मदत घेतली. परंतु, हे युद्ध लढून रशिया किमान 40 वर्षे मागे गेला आहे. आगामी काळात तो चीनवर अवलंबून राहणार असल्याने भारताची चिंताही वाढली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष खरोखर विदूषक असल्याचे स्पष्ट होत आहे. आता ते 'नाटो'मध्येही जाणार नाहीत, रशियाशी बोलणी करणार असे म्हणत असतील, तर एवढा नरसंहार त्यांनी का होऊ दिला? तथापि, या परिस्थितीत आपण मात्र आपल्या स्वावलंबनाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. संयुक्‍तराष्ट्रांत आपण कोणाचीही बाजू घेतली नाही. त्यामुळे अनेक देश नाराज आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. दुसरीकडे, तैवानने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि या पार्श्‍वभूमीवर आपण कोणती भूमिका घ्यावी, याबाबत देशात चर्चा सुरू आहे.

चीनने कधीही प्रामाणिकपणा दाखवला नाही, ही मोठी समस्या आहे. अक्साई चीन हा आपला 38 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा भूभाग चीनने व्यापलेला आहे आणि इतरत्रही अनेक ठिकाणी चीन दावे करत आहे. हॉट स्प्रिंग ही अगदी छोटीशी समस्या आहे. आपण यामुळे फारसे समाधानी होण्यात अर्थ नाही. भारताच्या मुत्सद्देगिरीच्या लिटमस टेस्टची हीच वेळ आहे आणि त्यात यशस्वी होण्यात आपण सक्षम आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT