वॉशिंग्टन : या नाम-रूपाच्या दुनियेत सर्व काही परिवर्तनशील असून कोणतीही गोष्ट शाश्वत नाही असे आपल्याकडे म्हटले जाते. ग्रह-तार्यांचे आयुष्य अब्जावधी वर्षांचे असले तरी कधी ना कधी त्यांचाही नाश होतच असतो. आपल्या ग्रहमालिकेचा तारा म्हणजेच सूर्य हा प्रकाश, उष्णता आणि ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, हा ताराही एक दिवस नष्ट होणार आहे. भविष्यात सूर्याचा मृत्यू कसा होईल याचे अनुमान आता 'नासा'च्या हबल टेलिस्कोपने टिपलेल्या एका छायाचित्रावरून लावता येऊ शकेल.
सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमसारख्या वायूंचा एक मध्यम आकाराचा उष्ण गोळाच आहे जो 4.5 अब्ज वर्षांपूर्वी बनला होता. सूर्याने आपल्या जीवनकाळातील निम्मा भाग पूर्ण केला आहे. सूर्याचा व्यास सुमारे 8,64,000 मैल म्हणजेच 1.4 दशलक्ष किलोमीटर इतका आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 10 हजार अंश फॅरेनहाईट म्हणजेच 5500 अंश सेल्सिअस इतके आहे. एखाद्या तार्याचा स्फोट होऊन मृत्यू होतो व त्यामधील घटक बाहेर उत्सर्जित होतात. या घटनेला 'सुपरनोव्हा' असे म्हटले जाते. त्यानंतर त्याचा प्रकाशमान नेब्युला बनत असतो.
मृत तार्यांचे रूपांतर प्रचंड आकर्षण शक्ती असलेल्या कृष्णविवरांमध्ये होत असते. पृथ्वीपासून सुमारे 1370 प्रकाशवर्ष अंतरावर सूर्यासारख्याच एका तार्याचा नेब्युला बनलेला आहे. या तार्याचे नाव 'एनजीसी 2438' असे आहे. या तार्यामधून मोठ्या प्रमाणात उत्सर्जित झालेल्या वायूंचे ढग नेब्युलामध्ये आहेत. आपल्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात सूर्यावरील हायड्रोजन संपून जाईल. त्यामुळे ही स्थिती सूर्याला अस्थिर बनवेल आणि तो एका सफेद गोळ्याच्या रूपात संपून जाईल.
सनस्पॉट आणि अन्य घटनांमुळे प्रकाशाच्या बाबतीत सूर्य अन्य तार्यांच्या तुलनेत अतिशय कमी सक्रिय असल्याचे दिसून येते. 'हबल'ने 'एनजीसी 2438'च्या टिपलेल्या छायाचित्रातील निळा रंग ऑक्सिजन, हिरवा रंग हायड्रोजन, नारंगी रंग नायट्रोजन आणि लाल रंग सल्फरला दाखवतो. 'हबल'ने हे छायाचित्र वाईड फिल्ड आणि 'प्लॅनेटरी कॅमेरा 2'च्या सहाय्याने टिपले आहे.